मुंबई : (Csmt Sawantwadi Road Express) गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास शनिवार, दि.१ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. मुंबई आणि दक्षिण कोकणमधील प्रवासी संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात असून पर्यटन, शिक्षण, रोजगार, उद्योग आणि व्यावसायिक प्रवासालाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनुसार ही गाडी क्रमांक 15087 सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि क्रमांक 15088 सावंतवाडी रोड–सीएसएमटी एक्स्प्रेस या नावाने दररोज धावणार आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतराचा हा प्रवास कोकणातील हजारो प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि थेट पर्याय ठरणार आहे.
या नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांदरम्यान अखंड रेल्वे संपर्काची नवी कडी निर्माण होणार आहे.(Csmt Sawantwadi Road Express)
कोकण रेल्वे मार्गावर वर्षभर प्रवाशांची मोठी गर्दी असते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे तिकिटांसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. नियमित गाड्यांची संख्या अपुरी असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना, कोकण विकास समिती आणि महाराष्ट्र रेल्वे परिषद यांनी अनेक वर्षांपासून या मार्गावर नवीन नियमित गाडीची मागणी सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीची दखल घेत रेल्वे बोर्डाने नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी दिली आहे.(Csmt Sawantwadi Road Express)
या रेल्वे सेवेचा सर्वाधिक लाभ दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत ये-जा करणारे नागरिक, लघुउद्योजक तसेच कोकणातील पर्यटन व्यवसायाला होणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, देवस्थाने आणि निसर्ग पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील पर्यटन क्षेत्रालाही नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Csmt Sawantwadi Road Express)
भारतीय रेल्वेच्या दृष्टीने ही सेवा केवळ आणखी एक एक्स्प्रेस नसून मुंबई आणि दक्षिण कोकण यांच्यातील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक रेल्वे जाळे उभारण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.(Csmt Sawantwadi Road Express)
दरम्यान, रेल्वे बोर्डाने गाडीला मंजुरी दिली असली तरी ही एक्स्प्रेस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत कधीपासून धावणार, तसेच तिचे वेळापत्रक आणि आरक्षणाची तारीख काय असेल, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांचे लक्ष आता रेल्वे प्रशासनाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ठरावी अशी महत्त्वाची घोषणा भारतीय रेल्वेने केली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि दक्षिण कोकणमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन आणि उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी आभार मानले. ही सेवा कोकणच्या विकासाला नवी गती देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Csmt Sawantwadi Road Express)