
महाराष्ट्राचा गवताळ प्रदेश हा पडीक नसून तो जैवविविधतेचा खजिना असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण, पुण्यातील गवताळ प्रदेशातून 'कॅन्सकोरा अग्नी' या नव्या वनस्पतीचा शोध लावतानाच त्याठिकाणी लागणारी आग ही या वनस्पतीसाठी नवसंजीवनी ठरत असल्याचे समोर आले आहे. हा शोध आयआयएसईआर (IISER) पुणे येथील डॉ. आशीष नेर्लेकर आणि नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे डॉ. शरद कांबळे यांनी लावला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील माळरानावरील वनस्पती सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना ही वनस्पती आढळली. सुरुवातीला ती आधीपासून ज्ञात असलेल्या कॅन्सकोरा अलाटा या प्रजातीसारखी वाटली. मात्र नमुने, वनस्पतिशास्त्रीय वैशिष्ट्ये आणि दशकभरातील क्षेत्रीय निरीक्षणांची तुलना केल्यानंतर ती विज्ञानासाठी पूर्णपणे नवी प्रजाती असल्याचे निश्चित झाले. यासंबंधीचे शोध वृत्त नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या नव्या प्रजातीला 'अग्नी' हे नाव देण्यात आले आहे. 'अग्नी' हा शब्द मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये 'आग' या अर्थाने वापरला जातो. भारतीय गवताळ परिसंस्थेतील आगीचे पर्यावरणीय महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि आगीकडे केवळ विनाशकारी शक्ती म्हणून पाहण्याची मानसिकता बदलावी, या उद्देशाने हे नाव देण्यात आल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
सध्या ही वनस्पती केवळ पुणे जिल्ह्यातील सुस टेकडी परिसरातील सवाना अधिवासात आढळली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तिची फुले आणि फळे दिसतात. ही प्रजाती आकाराने केवळ ३ ते १० सेंटीमीटर उंच वाढते.सध्या या वनस्पतीचा अधिवास केवळ सुमारे ०.३ चौरस किलोमीटर इतकाच मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात ती धोक्यात येऊ शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. पुढील व्यापक सर्वेक्षणांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अन्य गवताळ भागांतही तिच्या नोंदी मिळण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. आग रोखण्याची धोरणे आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षलागवड या दोन प्रमुख कारणांमुळे तिच्या अधिवासावर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय गवताळ परिसंस्थेचे स्वतंत्र परिसंस्था म्हणून संवर्धन करणे आवश्यक असल्याचे संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.
आगीशी असलेले नाते
संशोधनात आढळून आले की, ही वनस्पती दर एक ते पाच वर्षांनी आग लागणाऱ्या गवताळ अधिवासातच टिकून राहते. ज्या भागात आग रोखण्यात आली किंवा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली, त्या ठिकाणी ही प्रजाती आढळली नाही. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे उंच गवत टिकून राहते, झुडपांचे अतिक्रमण कमी होते आणि पानांचा जाड थर साचत नाही. अशा परिस्थितीतच या वनस्पतीसह अनेक दुर्मीळ गवताळ वनस्पतींचे अस्तित्व टिकते, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.