वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून बॅज आणि डोमिसाइल अनिवार्य; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती

 
Maharashtra Driving Licence Rules 2026
 
मुंबई (Maharashtra Driving Licence Rules 2026) : राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील प्रभू यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.
 
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग परवाना नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 
त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. या क्षेत्राचे नियमन करून राज्याला महसूल मिळावा आणि तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासन नियोजन करत आहे.
 
या नव्या व्यवस्थेनुसार बाईक टॅक्सी चालकांकडून दररोज पाच रुपये महसूल जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक राईडमागे दोन रुपये कल्याण निधीसाठी जमा करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कठोर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Driving Licence Rules 2026)
 
 
 
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियमांमध्ये महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. बाईक टॅक्सी चालकाकडे मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ३ नुसार वैध वाहनचालक परवाना; तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ नुसार सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र (बॅज) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा बॅज देण्यापूर्वी अर्जदाराची पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. (Maharashtra Driving Licence Rules 2026)
 
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ नुसार अर्जदाराने खाजगी दुचाकी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करता कामा नये; तसेच उर्वरित सर्व अटींची पूर्तता एका महिन्याच्या आत करण्याच्या अटीवर राज्य परिवहन प्राधिकरणाने उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या ॲग्रीगेटर कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रासाठी ३० दिवसांचा तात्पुरता परवाना देण्यास मान्यता दिली होती. (Maharashtra Driving Licence Rules 2026)
 
अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा रोखण्यासाठी परिवहन विभागाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे; तसेच राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकांकडून परवान्याशिवाय बाईक टॅक्सी सेवा चालविणाऱ्या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ८१४ दोषी वाहने आढळून आली. त्यापैकी १५१ वाहने जप्त करण्यात आली असून १४ गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले. या कारवाईत १६.२५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एप्रिल २०२६ ते मे २०२६ या दोन महिन्यांत २११ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ६६ वाहने जप्त करण्यात आली आणि २.३१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली. (Maharashtra Driving Licence Rules 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर