मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड; उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी

    31-Jul-2026   
Mantralaya Canteen
 
मुंबई : (Mantralaya Canteen) मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी, मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये (कॅन्टीन) जात तपासणी केली. यावेळी एफडीचे अधिकारी आणि वकिलांच्या पथकाने मंत्रालयातील दोन्ही उपहारगृहांची पाहणी केली.
 
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात विभागाने काही खासगी हॉटेल्सवर धाड टाकत अस्वच्छ हॉटेल्सवर कारवाई केली. याप्रकरणी काही हॉटेलचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने एफडीएला खासगी आस्थापनांप्रमाणेच सरकारी आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी विभागाने याबाबतचा अहवाल सादर केला.(Mantralaya Canteen)
 
न्यायालयात काय घडले?
 
यावेळी सरकारी वकिलांनी "मंत्रालयातील कॅन्टीमध्ये साधा एक कीटकही आढळला नाही," असा दावा मुंबई उच्च न्यायालयात केला. यावरून न्यायालयाने एफडीएची कानउघडणी केली. "मंत्रालयातील एवढ्या मोठ्या उपहारगृहात साधा एक कीटकही नाही, असे म्हणणे हास्यास्पद आहे. पंचतारांकित हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळतात. मग मंत्रालयातील कॅन्टीन एवढे साफ आहे, असे म्हणणे पटते का?" असा सवाल न्या. रवींद्र घुगे यांनी केला. तसेच न्यायालयाच्या चार वकील आणि एफडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला मंत्रालयातील कॅन्टीनची पुन्हा तपासणी करून दुपारी ३ वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या तपासणीवेळी व्हिडीओ काढण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाचे वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाड टाकत दोन्ही कॅन्टीनची पाहणी केली. मात्र, त्यापूर्वीच उच्च न्यायालयाचे आदेश येताच कॅन्टीनमध्ये तातडीने साफसफाई मोहिम सुरु करण्यात आली होती.(Mantralaya Canteen)
 
कॅन्टीन कर्मचाऱ्यांची तारांबळ
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर मंत्रालयातील कॅन्टीनधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एफडीएचे अधिकारी तपासणीसाठी येणार हे कळताच अचानक कॅन्टीनमध्ये साफसफाई करणे सुरु झाले. तसेच उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मंत्रालयाच्या कन्टीनमध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्या आहेत.(Mantralaya Canteen)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर