‘सर्वजण समान असले, तरी काहीजण अधिक समान असतात,’ हे जॉर्ज ऑर्वेलचे वाय भारतात काँग्रेस नेत्यांबाबत तंतोतंत खरे ठरते. केवळ विशिष्ट घराण्यात जन्म घेतल्याने काहीही बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, ही गोष्ट गांधी घराण्याचे सदस्य वारंवार दाखवून देतात. दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधींनी आपल्या बौद्धिक कुवतीला न पेलणारी टीका केली होती. आता त्या पक्षाच्या नामधारी अध्यक्षानेही आपल्या वयाला न शोभणारी टीका करुन तोच कित्ता गिरवला.
काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ काल पुन्हा एकदा घसरली. खरेतर त्यांची जीभ अलीकडच्या काळात वारंवार घसरतेच म्हणा. हे त्यांच्या वाढत्या वयोमानाइतकेच ढासळत्या नीतिमत्तेचेही लक्षण मानले पाहिजे. ‘नीट’ पेपरफुटीसंदर्भातील चर्चेत बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर असभ्य शब्दांत टीका केली. दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी ‘पॅलेट गन’द्वारे हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला. त्याबद्दल राहुल गांधी यांनी अमित शाह यांना थेट जबाबदार धरून टीकाही केली. आपल्या धन्याने ज्याच्यावर टीका केली, त्याच्यावर आपल्यालाही अधिक कठोर शब्दांत टीका केलीच पाहिजे, ही गोष्ट खर्गे यांच्यासारख्या निष्ठावान अनुयायाच्या नक्कीच लक्षात आली. "अमित शाह सभागृहात नसतात; पण ते आपल्या कॅबिनमध्ये बसून आपले भाषण ऐकत असतात. आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ते जर (सभागृहात) आले नाहीत, तर त्यांना आम्ही हाताने खेचून बाहेर काढू,” असे खर्गे राज्यसभेत बोलून गेले. त्यावर सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यावर खर्गे यांनी त्यावर थातुरमातुर स्पष्टीकरण दिले. पण, त्यांच्या मनात काय होते, ते सर्वांना कळून चुकले.
खर्गे यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही मागे असेच अपशब्द उच्चारले होते. एकदा तर त्यांनी मोदी यांना ‘दहशतवादी’ही म्हटले होते. ते वक्तव्य अंगलट आल्यावर त्यावर त्यांनी दिलेले केविलवाणे स्पष्टीकरण कोणालाच पटले नाही. विद्यार्थी आंदोलनावरील चर्चेत बोलताना आताही खर्गे यांनी सरकारच्या नव्या शिक्षण धोरणावरही टीका केली. तीसुद्धा वास्तवावर आधारित नव्हती, तर त्यामागे रा. स्व. संघ आणि ‘मनुस्मृती’वर टीका करण्याचा आपला कंडू शमविणे, इतकाच कुटिल हेतू होता. तसे केल्यास ते गांधी घराण्याच्या नजरेत उंच ठरतात आणि मुस्लीम मतपेढीलाही कुरवाळले जाते (अशी त्यांची समजूत आहे). मोदी सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण आणले. त्याचा हेतू विद्यार्थ्यांना भारताचा खरा इतिहास शिकविणे, शिक्षणाला आधुनिक कौशल्यांशी जोडणे, हाच आहे. त्यात आजवरच्या काँग्रेस सरकारने केलेले मुघलांचे उदात्तीकरण काढून टाकले असून, त्याऐवजी भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करणार्या चोल, गुप्त, मौर्य वगैरे राजघराण्यांच्या माहितीवर भर दिला आहे. या घराण्यांनी भारताला ‘सोने की चिडिया’ बनविले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या योद्ध्यांच्या कार्यावर अधिक विस्तारपूर्वक प्रकाश टाकला. पुढील काळात सनातन संस्कृतीच्या माहितीचाही समावेश केला जाईल. या सार्या गोष्टी माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राबविल्या होत्या. हिंदूविरोधी काँग्रेस, डावे आणि अन्य सेयुलर पक्षांना हे सारे पचविणे अवघड जात होते. म्हणून, पेपरफुटीचे निमित्त करून त्यांनी प्रधान यांचा राजीनामा घेतला. खर्गे यांनी भाषणात शैक्षणिक धोरणात ‘मनुस्मृती’चे शिक्षण दिले जात असल्याचा हास्यास्पद दावा केला. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी त्याला आव्हान देऊन हा अपप्रचार कामकाजाच्या नोंदींतून वगळला. खर्गे यांनी ‘मनुस्मृती’ वाचली तरी आहे का? त्यामुळे ऊठसूट ‘मनुस्मृती’, सनातन आणि रा. स्व. संघ यांच्यावर बिनबुडाची टीका करीत राहणे, इतकेच काँग्रेसच्या नेत्यांचे काम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह या प्रमुख भाजप नेत्यांवर काँग्रेसच्या नेत्यांचा, त्यातही गांधी घराण्याचा पूर्वापारचा विशेष राग. मोदी यांना सत्ताभ्रष्ट करण्याचे सर्व कायदेशीर उपाय थकल्यावर काँग्रेस आणि अन्य विरोधी नेते आता चक्क हातघाईवर येत आहेत, असे दिसते. कसेही करून, येनकेनप्रकारेण मोदी-शाह यांचा राजीनामा घेण्यासाठी काँग्रेस, म्हणजे गांधी घराणे आसुसले आहे. त्यासाठी आता हातघाईचा अवलंब करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. पूर्वीही मोदी यांना देशाचा युवा लाठीने मारहाण करील, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होतेच. ते त्यांच्या मनातील सुप्त आकांक्षा दर्शविणारे होते. संसदेच्या गेल्या सत्रात मोदी यांच्या आसनाजवळ काँग्रेसच्या काही महिला नेत्यांनी कोंडाळे केले होते आणि त्या मोदी सभागृहात येण्याची वाट पाहात होत्या. मोदी तेथे आले असता, त्यांच्याशी धक्काबुक्की करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वेळीच मोदी यांना सावध करून सभागृहात न येण्याचा सल्ला दिला आणि संभाव्य अनवस्था प्रसंग टळला.
आता जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय श्रेय लाटण्यासाठी राहुल गांधींनी कसलीही पूर्वसूचना न देता चक्क पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले. इतरांनीही येथे येऊन आपल्यासोबत आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. हा सारा तमाशा वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रसारित होत होता. पंतप्रधानांचे निवासस्थान हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर असून, तेथे सहजासहजी कोणालाही जाता येत नाही. पण, राहुल गांधी यांनी अनपेक्षितपणे आपल्या काही कार्यकर्त्यांसह चालत तेथे जाऊन आंदोलन सुरू केले. त्यांचे एकंदर वर्तन हे संशयास्पदच होते आणि गर्दी वाढली असती, तर त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसण्याचाही प्रयत्न केला असता, यात शंका नाही. कारण, राहुल गांधींना नीतिमत्तेची चाड तर नाहीच; पण जनामनाची लाजही ते कोळून प्यायले आहेत. लोकसभेतही त्यांचे वर्तन आणि वक्तव्य हे हेतुत: सत्ताधारी पक्षाचा अपमान करणारे असते.
भाजप किंवा मोदी यांच्यावर टीका करणे, हे विरोधी पक्षांचे कामच आहे. पण, टीका करताना ती किमान वास्तवावर आधारित असावी आणि ती सभ्य भाषेत केली जावी, ही अपेक्षा वाजवी म्हणता येईल. पण, काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे मोदी-शाह यांच्या वैयक्तिक द्वेषाने आंधळे झाले आहेत. परिणामी, त्यांची भाषा आता असभ्य आणि असंसदीय होत चालली आहे. राहुल गांधी किंवा प्रियांका यांच्याकडून फारशी अपेक्षा नसली, तरी त्यास खर्गे यांच्यासारखे वयस्क नेतेही अपवाद ठरत नाहीत, ही दुर्दैवी बाब. काँग्रेसने अशा गाळीव रत्नांना निदान संसदेवर तरी पाठवू नये.