डोंबिवली : (Cholegaon Talao) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील चोळेगाव तलावाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने आक्रमक पाऊल उचलण्यात आले आहे. विसर्जन बंद झाल्याने तलावाची दुरवस्था झाल्याचा दावा करत, यंदाच्या गणेशोत्सवात चोळेगाव तलावातच गणरायाचे विसर्जन केले जाईल, असा निर्धार नगरसेविका शारदा चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
केडीएमसीकडून ‘‘माझी वसुंधरा’’ अभियानांतर्गत चोळेगाव तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण दिड वर्षापूर्वी करण्यात आले. संवर्धन आणि सुशोभीकरण झाल्याने जलप्रदूषण टाळण्यासाठी तलावात गणेश, देवींच्या मूर्ती विसर्जनाला पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. परंतू नागरिकांकडून निर्माल्य, प्लास्टीकचा कचरा तलावात टाकला जात आहे. तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाला शेवाळयाचा विळखा पडला आहे. यावर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तलावात सर्रास कचरा पडतोय मग मूर्ती विसर्जनाला बंदी का? यंदा आम्ही भाद्रपदमध्ये गणेश मूर्तींंचे विसर्जन करणारच असा आक्रमक पावित्रा भाजपाच्या नगरसेविका चौधरी यांनी घेतला आहे.(Cholegaon Talao)
महापालिकेने लाखो रूपये खर्चुन तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला असलातरी त्याच्या देखभालीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याची प्रचिती ठाकुर्लीतील चोळेगाव तलाव पाहता येते. संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाच्या वेळी तलावातील पाणी आणि गाळ पूर्णपणे उपसण्यात आला होता. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी या तलावाला गणेशभक्तांकडून अधिक पसंती दिली जात होती. त्यामुळे याठिकाणाहून हजारोंच्या संख्येने मूर्त्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. परंतू सुशोभीकरणाच्या कामानंतर तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करायला पूर्णपणे बंदी घातली गेली आहे. भाद्रपद असो अथवा माघी गणेशोत्सवा दरम्यान याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येते. परंतू सध्याची परिस्थिती पाहता बंदी आदेश मोडून यंदा तलावातच गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय स्थानिकांसह चौधरी यांनी घेतला आहे.(Cholegaon Talao)
या तलावाच्या संवर्धनासाठी २५ ते ३० लाखांचा निधी वापरला गेला आहे मात्र इथले वास्तव पाहता तसे काम झाले आहे का? याबाबत शंका आहे. या कामांची प्रशासनाने शाहनिशा करावी. या तलावात पुर्वीपासूनच गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते. पर्यावरणाचे कारण पुढे करून विसर्जनाला बंदी घातली आहे. मात्र इथली दुर्दशा पाहता इथे कचरा सर्रास पडत आहे मग विसर्जनाला बंदी का? असा सवाल नगरसेविका शारदा चौधरी यांनी केली. तर तलावाच्या संवर्धनाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी केली आहे. (Cholegaon Talao)