ठाणे (Bhiwandi Building Collapse) : गुरुवार ३०जुलै रात्री भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील कोहीनूर इमारत (तळमजला अधिक चार मजले) पडल्याची दुर्घटना घडली. ही इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली असून, नारपोली येथील गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर इमारत कोसळल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Bhiwandi Building Collapse)
रात्री ११.०० ते ११.३० वाजताच्या दरम्यान बी ( B) विंग चा काही भाग कोसळला.ही इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. तरीही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. (Bhiwandi Building Collapse)
या इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या, (प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या.) रात्री ८.०० ते ९.०० वाजता इमारतीतून कर...कर...कट...कट असा आवाज येत असल्याने काही कुटुंबांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, काही लोक शिल्लक असताना व ते बाहेर पडत असतानाच इमारतीचा ‘बी विंग’ भाग अचानक कोसळला.
इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यापासून ते इमारत रिकामी करण्यापर्यंतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय पाणी व वीजपुरवठाही खंडित करून रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा दुरुस्ती सुरू ठेवण्यात आल्याने हा दुर्घटनेचा प्रकार घडल्याची माहिती महापालिकेने दिली. (Bhiwandi Building Collapse)
एनडीआरएफने अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले असून ते आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, भिवंडी महापालिका आणि आपत्कालीन सेवा पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.
#UPDATE | Maharashtra | The death toll in the Bhiwandi building collapse incident increases to nine: NDRF https://t.co/7kr7uGjxGQ
भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. (Bhiwandi Building Collapse)
यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. (Bhiwandi Building Collapse)
दुर्घटनेतील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घटनेची माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.शासनाच्या वतीने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सदर इमारतीच्या शेजारील इमारतीतील नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात आले असून त्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासन, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (Bhiwandi Building Collapse)