कल्याण : (Shri Malanggad) गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मलंगगडावर मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी “आई भवानी शक्ती दे… मलंगगडाला मुक्ती दे…” या जयघोषाने संपूर्ण श्री मलंगगड परिसर दुमदुमून गेला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री मलंगगडावर पुन्हा एकदा 'मलंग मुक्ती'चा एल्गार घुमला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री मलंगगडावर झालेल्या पूजनानंतर भाजपने हिंदुत्वाचा बुलंद हुंकार देत मलंगमुक्तीसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त केला. गडावर पूजा-अर्चना केल्यानंतर भक्तिमय वातावरणात उपस्थित हिंदू बांधवांनी श्री मलंगमुक्तीचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली. श्री मलंगगडावरील वातावरण हिंदूमय आहे.
मात्र या परिसरात मोठे अतिक्रमण झाले आहे, त्या अतिक्रमणापासून श्री मलंगगड मुक्त झालाच पाहीजे, असा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला. हे अतिक्रमण मोडून काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे लांडगे यांनी यावेळी सांगितले. आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला भाजप आमदार महेश लांडगे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रसिद्धी प्रमुख दिपेश म्हात्रे, गटनेते शशिकांत कांबळे, उपमहापौर राहुल दामले, नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश चव्हाण, कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विकी तरे, आशु सिंग, सुजल म्हात्रे, अभिषेक यादव, विपुल म्हात्रे तसेच हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख व श्रीमलंगगड परिसरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shri Malanggad)
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि हिंदू परंपरेप्रती असलेली अढळ श्रद्धा व्यक्त करण्यात आली. श्री मलंगगडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्याचबरोबर श्री मच्छिन्द्रनाथांच्या चरणी राज्याच्या सुख समृद्धीची, सर्वांच्या उत्तम आरोग्याची आणि श्रीमलंगगड मुक्तीच्या संकल्प पूर्तीची प्रार्थना यावेळी करण्यात आली. वर्षातील बारा पौर्णिमा हिंदूंनी उत्साहात साजऱ्या कराव्यात, असे आवाहन हिंदू मंचने केले होते. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने श्री मलंगगडावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती ठाणे जिल्हा हिंदू मंचचे दिनेश देशमुख यांनी दिली. (Shri Malanggad)
संघर्ष आणखी तीव्र करू
श्री मलंगगडावर हिंदू परंपरेनुसार पूजा-अर्चना करण्यात आली. संपूर्ण गड हिंदुमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री मलंगगड मुस्लीम अतिक्रमणातून मुक्त झाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. या गडाला अत्यंत पुरातन धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे धर्मांतराच्या कारवाया आणि लव्ह जिहादसारख्या प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आमचा आरोप असून, त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदुत्ववादी संघटना सातत्याने काम करत आहेत. श्री मलंगमुक्तीसाठी सरकारकडे ताकदीने पाठपुरावा करणार आहोत.
— महेश लांडगे, आमदार, भाजप
हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट
हिंदू धर्मीयांसाठी, विशेषतः नाथ संप्रदायासाठी श्री मलंगगडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या गडावर नाथपंथाची दीक्षा गादी असून, माघ पौर्णिमेला येथे हिंदू धर्मीयांकडून दर्शन, पूजा आणि आरती केली जाते. मुख्य स्थानापासून अलीकडे जातिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या समाधी आहेत. याच गडावर श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांचे मंदिर तसेच अन्य पाच नाथांच्या समाध्या आहेत. याशिवाय श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचेही मंदिर येथे आहे. दावा असा आहे की, सध्या दीक्षा गादी आणि दोन समाधी स्थळांवर अतिक्रमण झाले आहे. पेशव्यांनी या ठिकाणी पूजापाठ करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे दिला होता. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे चालत असून आजही येथे धार्मिक विधी हिंदू परंपरेनुसारच पार पडतात. धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनाही याच दीक्षा गादीवर नाथपंथाची दीक्षा देण्यात आली होती. त्यानंतर ते दरवर्षी होळी पौर्णिमेला श्री मलंगगडावर आरतीसाठी येत असत.
काय आहे वादाचा इतिहास?
या देवस्थानावर सुमारे १९२५ च्या सुमारास अतिक्रमण झाल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातो. त्याविरोधात त्यावेळी हिंदूंनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित हिंदू मंचने मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन सुरू केले. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांनीही १९९० च्या दशकात या आंदोलनात पुढाकार घेतला. सध्या या प्रकरणासंदर्भातील दावे ठाणे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय तसेच ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असून त्यामध्ये नासिर खान फाजल खान हे प्रतिवादी आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांच्या मते, श्री मलंगगड हे मूळ नाथपंथीय साधू मच्छिंद्रनाथ (श्री मलंग) यांचे तपोभूमी आणि धार्मिक स्थळ असून, पुढे येथे दर्गा उभारण्यात आला. नाथपंथाची दीक्षा गादी, समाधीस्थळे आणि मंदिर परिसरावर अतिक्रमण झाल्याचा दावा या संघटनांकडून सातत्याने केला जातो. या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित हिंदू मंच, शिवसेना, भाजप, विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी 'मलंग मुक्ती' आंदोलन छेडले. धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनीही या आंदोलनात पुढाकार घेतला होता. दुसरीकडे, मुस्लीम संघटना आणि दर्गा ट्रस्ट हे सर्व दावे फेटाळत या स्थळाचे ऐतिहासिक स्वरूप दर्ग्याचेच असल्याचा दावा करतात. या वादासंदर्भातील दावे सध्या ठाणे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय तसेच धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असून, धार्मिक स्वरूपाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे प्रशासन सध्या विद्यमान स्थिती कायम ठेवत दोन्ही समाजांना त्यांच्या परंपरेनुसार धार्मिक विधी करण्याची परवानगी देते. (Shri Malanggad)