मुंबई : (Devendra Fadnavis) नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि स्थानिकांच्या सहभागावर आधारित मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धन हे राज्य सरकारचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मंगळवार, दि.२९ रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित परिषदेत त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी राज्याची नवी पंचसूत्री जाहीर केली.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वन विभागाद्वारे येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनीवास राव यांच्यासह कंबोडिया, भूतान आणि बांग्लादेशातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री म्हणाले, वाघ हा जंगलातील अन्नसाखळीचा केंद्रबिंदू असून त्याच्या संवर्धनामुळे वन आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. त्यामुळे राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनाचे काम सुरू असून कोअर क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन, बफर क्षेत्रांचा विस्तार, कॅमेरा ट्रॅप आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अर्ली वॉर्निंग प्रणालीसारखे आधुनिक उपाय राबविण्यात आले आहेत. यामुळे २०१४ मध्ये १९० असलेली वाघांची संख्या ४४४ वर पोहोचली असून नव्या व्याघ्र गणनेत ती ६०० च्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील एकूण वाघांपैकी सुमारे ७५ टक्के वाघ भारतात असून महाराष्ट्र सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी काळात राज्याला अव्वल स्थानावर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
व्याघ्रसंवर्धनची पंचसूत्री नेमकी काय?
व्याघ्र संवर्धनासाठी सरकारने जाहीर केलेल्या पंचसूत्रीत मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे, व्याघ्र अधिवासात हरित उपजीविका अभियान राबविणे, सीएसआर निधी आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र धोरण, शाश्वत पर्यटनाला चालना देणे आणि पर्यटनातून वनसंवर्धनासाठी निधी उपलब्ध करणे या पाच मुद्द्यांचा समावेश आहे. (Devendra Fadnavis)
एकूण ११ सामंजस्य करार
वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात ३०० कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून रोपांची निर्मिती वाढविण्यासाठी पाच टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी एकूण ११ सामंजस्य करार करण्यात आले. या परिषदेत समुदाय आधारित हरित अर्थव्यवस्था, व्याघ्र संवर्धनातील सीएसआर गुंतवणूक, महाराष्ट्राला टायगर टुरिझमचे प्रमुख केंद्र बनविणे आणि मानव-वाघ सहअस्तित्व या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले. (Devendra Fadnavis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.