तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! आता राज्यातील शाळांच्या ५० मीटर परिसरात केक-चॉकलेटसह जंक फूड विक्रीला बंदी!

    29-Jul-2026
Tukaram Mundhe
 
मुंबई : (Tukaram Mundhe) महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, शाळेच्या आवारापासून ५० मीटरच्या परिसरात चरबी, साखर आणि मीठ यांचे प्रमाण जास्त असलेल्या प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेजबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, शाळांमधील स्वयंपाकगृह चालविणारे आणि शाळांना अन्नपुरवठा करणाऱ्या सर्व संस्था किंवा कंत्राटदारांकडे अन्न सुरक्षा नियमांनुसार वैध परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात एफडीएने शाळांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना पौष्टिक, सुरक्षित आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, चिप्स, नूडल्स, साखरयुक्त शीतपेये श्रेणीतील इतर खाद्यपदार्थ शाळेच्या परिसरात उपलब्ध करून देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.(Tukaram Mundhe)
 

Tukaram Mundhe 
 
नव्या सूचनांनुसार, प्रत्येक शाळेने कँटीन किंवा स्वयंपाकगृह चालविणाऱ्या संस्थेकडे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत आवश्यक परवाना असल्याची खात्री करावी. शाळांना अन्नपुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनाही नोंदणी किंवा परवाना घेणे आवश्यक राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.(Tukaram Mundhe)
 
एफडीएने शाळांना आरोग्य समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत. या समितीत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, पोषणतज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असावा. ही समिती शालेय कँटीनमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि स्वच्छतेवर नियमित देखरेख ठेवेल.(Tukaram Mundhe)
 
पौष्टिक पर्याय
 
याऐवजी शाळांच्या कँटीनमध्ये फळे, भाज्या, दूध, ताक, नारळपाणी, इडली, उपमा, पोहे, खिचडी, चपाती, डाळ-भात, बहुधान्य पदार्थ यांसारखे पौष्टिक पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे एफडीएचे मत आहे.(Tukaram Mundhe)
 
 




संबंधित मजकूर