मुंबई: (Nitesh Rane) नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, या आंदोलनाच्या आडून महाराष्ट्रात किंवा देशात 'गजवा-ए-हिंद चा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला. तसेच या प्रकरणामागील सर्व संबंधितांपर्यंत पोहोचून सखोल तपास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नीट परीक्षेतील त्रुटी मान्य करत केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालय त्या सुधारण्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, आंदोलनादरम्यान काही घोषणाबाजी आणि काही घटकांचा सहभाग संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.(Nitesh Rane)
राणे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर हे केवळ नीट विद्यार्थ्यांचे आंदोलन होते, तर त्यामध्ये 'सर तन से जुदा' सारख्या घोषणा का देण्यात आल्या? औरंगजेबाचे पोस्टर का झळकवण्यात आले? उमर खालिदला समर्थन करणारे लोक तिथे का उपस्थित होते? असा सवाल त्यांनी केला. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशातील काही सोशल मीडिया खात्यांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे, याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Nitesh Rane)
महाराष्ट्र सायबरकडे पुरावे असल्याचा दावा
राणे म्हणाले की, महाराष्ट्र सायबरकडे या प्रकरणासंदर्भात काही पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्याआधारे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असून, तपास सखोलपणे केला जात आहे. देशविरोधी किंवा धार्मिक कट रचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही टीका केली. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी आपण नेमके कोणाच्या विचारांवर चालत आहोत, याचा विचार करावा," असे ते म्हणाले.(Nitesh Rane)
कुणाल कामरावर निशाणा
शिवाजी पार्कवरील आंदोलनात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा उपस्थित असल्याचा उल्लेख करत राणे यांनी त्यांच्यावरही टीका केली. भगवान राम आणि माता सीता यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आंदोलनात स्थान का देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Nitesh Rane)
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, कटाला विरोध
राणे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, नीट विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्यांना सरकारचा विरोध नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशविरोधी किंवा धार्मिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार असून, अशा सर्व घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.(Nitesh Rane)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.