मुंबई : (Navnath Ban) "स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी इथल्या शिक्षणव्यवस्थेला दोष देणे बंद करा,.रोज उठून पेपरफुटी होत असल्याच्या खोट्या अफवा पसरवण्याचे काम संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. परंतु पेपर फुटल्याचा एकही पुरावा यापैकी कुणीच देऊ शकले नाही. राज्यात कुठेही पेपरफुटी झालेली नाही. एमपीएससी आणि सीईटी सेलच्या अध्यक्षांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर सारे मूग गिळून गप्प बसले. महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था सक्षम होती आणि सक्षम आहे. महाराष्ट्रात अतिशय दर्जेदार शिक्षण मिळत आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची आणि इथल्या शिक्षणव्यवस्थेची बदनामी करू नका." असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.(Navnath Ban)
बुधवार दि.२९ रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका राहुल गांधी असल्याचे सांगत बन म्हणाले," तुमच्या आकांना जाऊन विचारा की पंजाबमध्ये, कर्नाटकात पेपरफुटी झाली त्यावर काय कारवाई केली? उलट कोणावरही कारवाई केली नाही. उलट महाराष्ट्रात ना एमपीएससीचा पेपर फुटला, ना सीईटीचा पेपर फुटला. तुमच्याकडे एकही पुरावा नाही. हर्षवर्धन सपकाळ खोटे बोलल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत ६० टक्क्यांच्या आसपास गुण मिळाले आहेत." असेही बन म्हणाले.(Navnath Ban)
"ज्या औरंगजेब फॅन क्लबचे संजय राऊत तोंड फाटेपर्यंत कौतुक करतात, बाबराचे, मुघलांचे, अब्दालीचे कौतुक करतात, त्यांचा इतिहास अभ्यासक्रमातून हटवण्यात आला हीच त्यांची खरी पोटदुखी आहे. परंतु इथे आता मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराणा प्रतापांचा इतिहास शिकवला जाईल. मुघलांचे कौतुक आता बंद झाल्याने तुम्हाला शिक्षणव्यवस्था वाईट वाटते. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र चालवण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी संजय राऊतांकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही." असे बन यांनी फटकारले.(Navnath Ban)
"पंडित नेहरू आणि राहुल गांधींवर टीका केली की संजय राऊत पुढे येतात. सोनिया गांधींवर टीका केली की त्यांचे कौतुक करण्यासाठी संजय राऊत पुढे येतात. याच सोनिया गांधींचा ‘करप्शन क्वीन’ म्हणून उल्लेख केला होता हे संजय राऊत, तुम्हाला आठवते का? आता फक्त आणि फक्त राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी संजय राऊत राहुल गांधींची चाटुगिरी करत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि खासदारकीसाठी तुम्ही काँग्रेसची गुलामी करणार असाल तर या देशातील जनतेने काँग्रेसचे जहाज बुडवले आहे आणि काँग्रेसच्या नादाला लागल्यामुळे उबाठा गटाचेही जहाज बुडणार आहे." असेही बन यांनी सुनावले.(Navnath Ban)
आरोप सोपे, पुरावे कुठे? - चित्रा वाघ
"संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना जेन झी ' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का?
कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा!
लातूर नीट घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत!महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा जेन झी कोणाचा पाळीव नाही. तो प्रश्न विचारणारच!"अशी विरोधकांवर खरमरीत टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केली आहे.(Navnath Ban)