मुंबई : (Mumbai University) मुंबई विद्यापीठातील टी.वाय.बी.कॉम. पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई महानगर यांच्या वतीने २० एप्रिलपासून सातत्याने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी अखेर मान्य झाली असून, दि. २७ जुलै रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या संदर्भातील ठराव संमत करण्यात आला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविपने उभारलेल्या सातत्यपूर्ण आणि संघर्षशील लढ्याचा महत्त्वपूर्ण विजय आहे.
तथापि, या ठरावासोबत चौकशीच्या अटी व कार्यकक्षा निश्चित करण्याचे अधिकार कुलगुरूंना देण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशी प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी ती कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेप, पक्षपात किंवा दबावापासून मुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे. अभाविपची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की, या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ तसेच मुंबई विद्यापीठाच्या लागू नियमावलीनुसारच करण्यात यावी. चौकशीदरम्यान कोणत्याही दोषी व्यक्तीस संरक्षण मिळू नये, कोणतीही माहिती दडपली जाऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या प्रत्येक दोषीवर कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी अभाविप मागणीची मागणी आहे.(Mumbai University)
पेपरफुटी हे केवळ प्रशासकीय अपयश नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि विद्यापीठाच्या विश्वासार्हतेशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या चौकशीत पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व राखणे ही काळाची गरज आहे. मुंबई विद्यापीठाची परीक्षा व्यवस्था आणि संस्थेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी ही चौकशी वेळेत, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत पूर्ण व्हावी, अशी अभाविपची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविप पुढील काळातही या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे अभाविप तर्फे स्पष्ट करण्यात आले.(Mumbai University)
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार, महानगर सह मंत्री समीर हरजानी, शशिकांत चौहान, अलका यादव व कोकण प्रांत मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे उपस्थित होते.(Mumbai University)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक