मिरजमध्ये साकारणार अत्याधुनिक ‘म्युझिक हेरिटेज पार्क’

आराखडा तयार करण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

    29-Jul-2026   
Miraj Music Heritage Park
 
मुंबई : (Miraj Music Heritage Park) मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी तिथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी दिले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित संस्थांची तातडीने संयुक्त बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त बी. टी. यशवंते तसेच माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील तंतुवाद्य निर्माते व कारागीर उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मिरजच्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरज ही वैद्यकीय नगरीबरोबरच देशातील महत्त्वाची संगीतनगरी असून येथे सुमारे २०० कुटुंबे पारंपरिक हस्तकलेद्वारे सितार, तानपुरा, सुरबहार, दिलरुबा, मयुरी वीणा आदी तंतुवाद्यांची निर्मिती करतात. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.(Miraj Music Heritage Park)
 
जागतिक स्तरावर नवी ओळख
 
ते म्हणाले की, "या प्रस्तावित प्रकल्पामध्ये आधुनिक तंतुवाद्य निर्मिती केंद्र, विशेष वाद्य संग्रहालय, प्रदर्शन दालन, परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर, संगीत इतिहासाचे दस्तावेजीकरण, संशोधन सुविधा तसेच कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि नियमित सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्याचा समावेश असावा. मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा व्यापक सांस्कृतिक प्रकल्प ठरेल. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून संग्रहालय संकल्पना, वाद्य वारसा संवर्धन, महोत्सव आयोजन, संकल्पनात्मक आराखडा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तर जमीन, निधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या स्तरावर करण्यात यावे."(Miraj Music Heritage Park)
 
लवकरात लवकर बैठक घ्या
 
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्पाचे सादरीकरण, जागेची उपलब्धता, निधीचे नियोजन आणि प्राथमिक आराखडा निश्चित करावा. मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेचे जतन करून तिला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.(Miraj Music Heritage Park)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर