मुंबई : (Abhangwari Shubhasarita Dari) बोरिवलीच्या श्रीकृष्णनगर आणि अभिनवनगर यांना जोडणाऱ्या शुभसरिता हौसिंग सोसायटीमध्ये यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'अभंगवारी शुभसरिता दारी' हा आगळावेगळा सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्कृती, भक्ती, संगीत आणि सामुदायिक सहभाग यांचा 'सुंदर संगम' उपस्थितांना या कार्यक्रमातून अनुभवयास मिळाला.
आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सोसायटीच्या आवारात चाललेल्या या कार्यक्रमात १५ कलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन व समन्वय प्रसाद आरोसकर यांनी केला, तर संगीत दिग्दर्शन व कलाकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संदीप बेलोसे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. मंच उभारणी, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, सजावट, ध्वनी व प्रकाश व्यवस्था, आसनव्यवस्था आदी सर्व तयारी सोसायटीतील सदस्यांच्या सहकार्याने साकारली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी लागणारा सर्व खर्च कलाकार व सोसायटीतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे उचलला. संपूर्ण सोसायटीने एकजुटीने या कार्यक्रमात हातभार लावला.(Abhangwari Shubhasarita Dari)
कार्यक्रमाच्या तयारीसाठी साधारण महिनाभर नियमित सराव करण्यात आला. गीतांची निवड, क्रमवारी, गायकांचे नियोजन यासह सर्व बाबींचे बारकाईने नियोजन करण्यात आले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कलाकारांनी वेळेचे काटेकोर पालन करून मनापासून सराव केला.(Abhangwari Shubhasarita Dari)
सायंकाळी मंगलमय वातावरणात शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी काजल गावडे आणि मंजुषा बेलोसे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. बालकलाकार आराध्य बेलोसे व अद्वैत नायर यांनी "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला..." हे गीत सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. सोसायटीचे सचिव सुनील भगत यांनी "यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी" ही गवळण सादर केली तर बाळकृष्ण शेंद्रे यांनी "विठू माऊली तू माऊली जगाची" या गीतातून विठ्ठलभक्तीची अनुभूती दिली.(Abhangwari Shubhasarita Dari)
बालकलाकार ऋचा आरोसकर हिने "रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली" हे गीत सादर करून आई-बाळाच्या नात्याचा भावस्पर्शी आविष्कार घडविला. आद्या राणे हिने 'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे गीत आपल्या मधुर आवाजात सादर केले. त्यानंतर स्मिता दळवी यांनी 'देव माझा विठू सावळा' हे गीत सादर करून विठ्ठलाचे सुंदर रूप शब्दांत उभे केले. संदीप बेलोसे यांनी 'अवघे गरजे पंढरपूर' हे गीत सादर करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. करुणा महाजन हिने "टाळ बोले चिपळीला" या गीताने रसिकांची मने जिंकली तर बालकलाकार मनस्वी बेलोसे हिने "सुंदर ते ध्यान,उभे विटेवरी" हे गीत इतक्या सुंदररीत्या सादर केले की श्रोत्यांनी तिला "वन्स मोअर"ची दाद दिली.(Abhangwari Shubhasarita Dari)
यानंतर किशोर जव्हारकर यांनी "चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी" हे गीत दमदार आवाजात सादर केले. अक्षता मावळंकर यांनी "रखुमाई रखुमाई, तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना" हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ममता ठाकूर यांनी "खेळ मांडीयेला वाळवंटी घाई" हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.(Abhangwari Shubhasarita Dari)
कार्यक्रमाची सांगता सार्थक बेलोसे यांनी "कानडा राजा पंढरीचा" या लोकप्रिय गीताने केली. त्यानंतर सर्व कलाकारांनी एकत्रित "हेचि दान देगा देवा" ही आरती सादर करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित प्रेक्षकांनी हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व अविस्मरणीय झाल्याची भावना व्यक्त केली. समाजातील सर्व वयोगटातील सदस्यांनी एकत्र येऊन भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडवून आणला. खऱ्या अर्थाने "अवघा रंग एक झाला" या अभंगातील भावार्थ या कार्यक्रमातून साकार झाला आणि "अभंगवारी शुभसरिता दारी" हा उपक्रम सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा अविस्मरणीय सोहळा ठरला.(Abhangwari Shubhasarita Dari)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक