मुंबई : ( Badshah) प्रसिद्ध रॅपर बादशहा आणि त्याची पत्नी, अभिनेत्री ईशा रिखी यांच्या वैवाहिक आयुष्यात काही सुरळीत नसल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. ईशा रिखीने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भीती आणि संघर्षावर मौन सोडले आहे. "मी खूप काळ भीतीपोटी शांत राहिले, पण आता सर्व काही ठीक असल्याचे नाटक करणे थांबवण्याची वेळ आली आहे," असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ( Badshah)
ईशा रिखीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिले?
ईशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले कि, "काही लढाया अशा असतात ज्यांचे कोणतेही दृश्य व्रण उरत नाहीत. खूप काळ मी गप्प राहिले कारण मी घाबरले होते. माझ्या पतीचा प्रभाव, ताकद आणि साधनांमुळे मी अस्वस्थ झाले होते आणि शांत राहणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे, असे मी स्वतःला पटवून दिले होते. माझे मौन म्हणजे परिस्थितीचा स्वीकार नव्हता, तर ते केवळ माझे अस्तित्व टिकवण्यासाठी होते. आज मी भीतीपेक्षा धैर्याची निवड करत आहे. कदाचित मी संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी अजून तयार नसेन, पण सर्व काही ठीक असल्याचे भासवणे मी आता थांबवत आहे."
विभक्त होण्याच्या चर्चांना का आले उधाण?
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्याच्या काही दिवसांपूर्वीच ईशाने बादशहासोबतच्या लग्नातील व काही जुन्या क्षणांचा एक व्हिडिओ मॉंटेज शेअर केला होता. त्याला तिने "प्रत्येक वादळ एक धडा शिकवून जाते, प्रत्येक प्रार्थना ही एक आशा असते" असे कॅप्शन दिले होते. तेव्हापासूनच चाहत्यांना या जोडप्यात काहीतरी बिनसल्याची शंका आली होती. ईशाच्या या भावनिक पोस्टनंतर जॅस्मिन भसीन, सना मकबूल, साहिल आनंद आणि श्रुती सोढी यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला व पाठिंबा दर्शवला आहे. ( Badshah)
नात्याची पार्श्वभूमी
बादशहा आणि ईशा रिखी यांनी काही महिन्यांपूर्वी एका खाजगी सोहळ्यात विवाह केला होता. सुरुवातीला हे लग्न गुप्त ठेवण्यात आले होते, मात्र नंतर ईशाच्या आईने सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर या लग्नाची पुष्टी झाली होती. बादशहाचे हे दुसरे लग्न असून, २०२० मध्ये त्याचा पहिली पत्नी जॅस्मिन हिच्यासोबत घटस्फोट झाला होता. ईशाच्या या गंभीर आणि धक्कादायक पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकरणावर रॅपर बादशहाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. ( Badshah)