डोंबिवली : (Vijaya Mehta) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निकट सहवासात राहिलेल्या मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक प्रेरणादायी पैलू रसिकांसमोर उलगडले. निमित्त होते ते पै फ्रेंड्स लायब्ररी, फ्रेंड्स कट्टा आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘विजयाबाई’ या कार्यक्रमाचे.
हा कार्यक्रम शुभमंगल कार्यालय येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात निखिला इनामदार यांच्या सूत्रसंचालनाने झाली. विजया मेहता आणि नटराजाच्या प्रतिमेला चाफ्याची फुले अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुकुल द डे स्कूलचे मुख्याध्यापक व संचालक अजित करकरे यांनी पारंपरिक तिसरी घंटा वाजवून मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन केले.(Vijaya Mehta)
आशुतोष वाघमारे यांनी घेतलेल्या विशेष संवादात प्रतिमा कुलकर्णी, स्वाती चिटणीस, विद्याधर पाठारे आणि राम दौंड यांनी विजयाबाईंच्या सहवासातील अनुभव कथन केले. त्यांची वेळेची काटेकोर शिस्त, कामातील परिपूर्णता, प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास, कलाकारांशी असलेले आत्मीय नाते आणि दिग्दर्शनातील संवेदनशीलता यांचे अनेक प्रसंग त्यांनी उलगडून सांगितले. एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचूनही विजयाबाईंचा साधेपणा, संयम आणि माणुसकी कायम राहिली, यावर सर्व वक्त्यांनी भर दिला.(Vijaya Mehta)
माधवी जोशी, मंजिरी साने आणि दिव्या गोगटे यांनी गिरीश कुबेर यांच्या विजयाबाईंवरील लेखाचे अभिवाचन केले. मुलाखतीसारख्या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेलाही विजयाबाई किती अभ्यासपूर्वक आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे सामोऱ्या जात असत, याचे चित्रण या अभिवाचनातून प्रभावीपणे उभे राहिले.(Vijaya Mehta)
कार्यक्रमात पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तक-पुष्प आणि श्रीकला संस्कार न्यासतर्फे सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप आशुतोष वाघमारे यांनी सादर केलेल्या ‘प्रभू चालले ग बाई…’ या भावस्पर्शी गीताने झाला. वृषांक कवठेकर यांनी आभार मानले.(Vijaya Mehta)
मुसळधार पावसाची पर्वा न करता उपस्थित राहिलेल्या रसिकांच्या प्रतिसादामुळे हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर सोहळा न ठरता, विजयाबाईंच्या कलादृष्टी, कार्यशिस्त आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत अनुभव देणारा प्रेरणादायी संवाद ठरला.(Vijaya Mehta)