नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो... सोशल मीडियावर वाट्टेल ते व्यक्त होण्यापूर्वी कविता नक्की वाचा!

    28-Jul-2026

Saleel Kulkarni
 
 
मुंबई : “नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो, रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो… नवीन डेटापॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…”, सोशल मीडिया जगात आपल्या नावाआडून वेगळेच नाव लावून ‘ट्रोलिंग’, ‘बुली’ आणि वाट्टेल ते बोलणाऱ्यांसाठी गायक सलील कुलकर्णींनी तयार केलेली कविता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 
सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर निरीक्षण करत असताना ही कविता लिहीली व सादर केली. निनावी आणि चेहरे नसलेल्या माणसांच्या वृत्तीवर बोट ठेवणारी ही कविता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ते म्हणतात, “कुठून येते ही वृत्ती ? कोणाविषयीच आदर न वाटणारी, ते एखादंच वाईट वाक्य बोलतात पण जो ऐकत असतो, त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर? तो जगण्यावर रुसला तर ? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली”, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.
संपूर्ण कविता

नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो...
रोज वेगळं नाव लावून लपून लपून भूंकींन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही
कुणी यासाठी तुमच्याकडे डीग्री वैगरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको विषयाचीही जाण नको
आपण नक्की कोण, कुठले याचे सुद्धा भान नको
 
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी
दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
 
चालव बोटे धारधार शब्दांमधून डंख मार
घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो
 
नवीन डेटा पॅक देरे आभाळावर थुंकीन म्हणतो
खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव
 
ज्याला वाटेल जसे वाटेल धरुन धरुन खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप खोटी नावे फसवे रूप
 
जेव्हा कुणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे चावून चावून खाऊ सारे
 
जोपर्यंत तूटत नाही, धीर त्याचा सुटत नाही
सगळे मिळून टोचत राहू त्याच्या डोळ्यात बोचत राहू
 
धाय मोकलून रडेल तो चक्कर येऊन पडले तो
तेवढ्यात कुणी दुसरे दिसेल ज्याच्या सोबत कुणी दिसेल
 
आता त्याचा ताबा घेऊन त्याच्यावरती राज्य देऊ
मग घेऊ नवीन नाव, नवा फोटो नवीन नाव
 
त्याच शिव्या तेच शाप त्याच शिड्या तेच साप
वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो
 
जरा कुणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो 
थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्तयं
एका वाक्यात खचते कुणी फिलिंग किती मस्तयं
 
नवा डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो!








संबंधित मजकूर