निर्ढावलेले प्रशासन


आगामी सिंहस्थासाठीची विकासकामे नाशिककरांसाठी फायद्याची कमी आणि गैरसोयीचीच अधिक झाली आहेत. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तर हे अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. या गलथान कारभारावर आता नाशिककरांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही टीकेची झोड उठवल्याने, नाशिक महापालिका प्रशासन किती निर्ढावलेले आहे हेच दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून अजूनही प्रशासकीय राजवट सुरू असल्याच्याच तोऱ्यात, शहराचा कारभार हाकला जात आहे. परिणामी, शहराच्या बकाल अवस्थेसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरत, आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील रखडलेली विकासकामे, खड्डेमय रस्ते, वाहतुककोंडी, अपुरी स्वच्छता व्यवस्था, अनियमित पाणीपुरवठा आणि वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राज्य शासनाकडून विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही, अनेक प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत असल्याने भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ॲड. राहुल ढिकले यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. प्रशासनातील उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव, यामुळे नाशिकचे नियोजन कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात आठ दिवसांपूवच वापरासाठी सुरू करण्यात आलेले नवीन रस्तेही पावसाने धुऊन गेल्याने, ‌‘मनपा‌’ प्रशासनाचा धाकच ठेकेदारांना नसल्याचे यावरून उघड झाले आहे. यासोबतच शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक भागांमध्ये साचणारे पाणी, अपुरी जलनिःस्सारण व्यवस्था आणि स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वाहतुककोंडी, अनधिकृत बांधकामे आणि मूलभूत सुविधांतील त्रुटी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‌‘ड्रीम प्रोजेक्ट‌’ असलेल्या ‌‘रामकाल पथ‌’ या प्रकल्पाचेही काही काम पावसाचे पाणी आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे सिंहस्थात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना आपण नेमके काय दाखवणार आहोत, याचाही विचार प्रशासनाने करावा.

पावित्र्याला ग्रहण

संतांची भूमी, धार्मिक परंपरेचे केंद्र आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध शहर म्हणून नाशिक देशभर ओळखले जाते. रामकुंड, पंचवटी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, गंगाघाट, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, श्रीसप्तश्रृंगी देवी, धोडप किल्ला, रामशेज किल्ला अशा ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर, दररोज हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात. मात्र, अलीकडच्या काळात काही हुल्लडबाज आणि बेशिस्त प्रवृत्तींमुळे, या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. प्रशासनाची उदासीनता आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. धार्मिक स्थळांच्या परिसरात दुचाकींवर स्टंटबाजी, कर्णकर्कश हॉर्न, मोठ्या आवाजात संगीत, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान, कचरा टाकणे आणि भिंतींवर नाव कोरण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी तर पर्यटकांपेक्षा हुल्लडबाजांचाच वावर अधिक असल्याचे चित्र दिसते.

त्यामुळे भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परदेशी पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळे ही केवळ पर्यटनाची ठिकाणे नसून, ती आपल्या संस्कृतीची ओळखही आहेत. अशा ठिकाणांची तोडफोड आणि विद्रूपीकरण म्हणजेच, आपल्या इतिहासाचा आणि परंपरेचा अवमान. नागरिकांच्या तक्रारीनंतर केवळ काही दिवसांपुरतीच कारवाई होते. त्यानंतर पुन्हा पूर्वीचेच प्रकार सुरू होतात. त्यामुळेच पोलीस, महापालिका, पुरातत्त्व विभाग आणि संबंधित प्रशासन यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. संवेदनशील ठिकाणी ‌‘सीसीटीव्ही‌’ यंत्रणा, नियमित पोलीस गस्त, दंडात्मक कारवाई आणि प्रभावी देखरेखही अनिवार्य झाली आहे. तसेच, स्थानिक नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि युवकांनीही वारसा जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जनजागृती आणि शिस्त या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरील बेशिस्त प्रकार कायम राहिले, तर नाशिकच्या प्रतिमेला मोठाच धक्का बसू शकतो. हुल्लडबाजांच्या बेफिकिरीमुळे नाशिकची ओळख असलेला अमूल्य वारसा हळूहळू नष्ट होत जाईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनासह समाजालाही स्वीकारावी लागेल.





विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर