राज्यात ३ हजार ४३६ जणांना मिळाली 'शेतकरी' म्हणून ओळख

महाराजस्व अभियानात महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र

    28-Jul-2026
Maharajswa Abhiyan
 
मुंबई : (Maharajswa Abhiyan) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्यावतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यात सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात पहिल्या सहा दिवसांत राज्यात ३ हजार ४३६ महिलांची नावे ‘महिला शेतकरी’ म्हणून नोंद करण्यात आली. यात सर्वाधिक १ हजार २१९ महिला शेतकऱ्यांची नोंद नागपूर विभागात करण्यात आली.(Maharajswa Abhiyan)
 
दि. २२ जुलैपासून सुरू झालेल्या या अभियानात पहिल्या सहा दिवसांत, राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित शिबिरांमधून तब्बल ४ लाख ३५ हजार २०९ नागरिकांनी विविध महसुली सेवा आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. २ ऑगस्टपर्यंत हे अभियान राज्यभरात सुरु राहणार असून, राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी या अभियानात सकारात्मक सहभाग देत आहेत.(Maharajswa Abhiyan)
 
नागरिकांना १५ प्रकारच्या महसुली सेवा
 
या अभियानादरम्यान राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील विविध घटकांसाठी महसूल विभागाकडून कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून १५ प्रकारच्या महसुली सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. महिलांना जमिनीचे हक्क मिळवून देत शेतकरी दर्जा देण्याच्या निर्णयांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार ६७ महिलांच्या नावे नोंदी करण्यात आल्या. तर गडचिरोलीमध्ये ७५, भंडारा येथे ३९ आणि चंद्रपूर येथे ३८ महिलांना शेतकरी दर्जा प्रदान करण्यात आला. तसेच गावठाणातील नागरिकांना जमिनीची मालकी देणाऱ्या 'स्वामित्व सनद' वाटप कार्यक्रमात नागपूर येथे ४२६, अमरावती येथे ३६८, अकोला येथे २९४ आणि गोंदियामध्ये १५३ नागरिकांना सनदीचे वाटप करण्यात आले.(Maharajswa Abhiyan)
  
रस्त्यांचे वाद मिटवून शेत रस्ते मोकळे
 
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'अंतर्गत अकोला जिल्ह्यात तब्बल २,७९७ रस्त्यांचे वाद मिटवून शेत रस्ते मोकळे करण्यात आले. त्यासोबतच गोंदियामध्ये ४२२, नागपूर येथे १६५, भंडारा येथे १४५ आणि चंद्रपूर येथे ९२ पाणंद रस्ते शेतकर्‍यांसाठी खुले करण्यात आले. याशिवाय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद करत चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ९ हजार ६१६, गोंदियामध्ये १ हजार ६२९ आणि कोल्हापूर येथे ५१९ लाभार्थ्यांना थेट सहाय्य पुरवण्यात आले. शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या कामात चंद्रपूरमध्ये ६१७, गोंदियामध्ये ५०४ आणि नागपूरमध्ये ५३६ कुटुंबांना दिलासा देण्यात आला.(Maharajswa Abhiyan)
 
सातबारा अद्ययावतीकरणासाठी राबवण्यात आलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेत सातारामध्ये २ हजार ७३३, बुलढाण्यामध्ये १ हजार ४६०, अमरावतीमध्ये ६६०, नागपूरमध्ये ६५२ आणि सांगलीत ५४३ शेतकऱ्यांचे महसुली प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले. जिल्हा व विभागनिहाय एकूण आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात १५ हजार ८४३, कोल्हापूर १४ हजार २८९, सातारा १४ हजार १८९, चंद्रपूर १२ हजार ७०१, अमरावती १२ हजार ५७, गोंदिया ११ हजार १५५, पुणे १० हजार ४३८ आणि अकोल्यामध्ये ८ हजार ८६२ लाभार्थ्यांनी या मोहिमेचा थेट लाभ घेतला आहे. तर, संपूर्ण राज्यात एकूण २ लाख ३९ हजार ७४४ लाभार्थी या अभियानाशी जोडले गेले.(Maharajswa Abhiyan)
 
"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात महसूल विभाग राज्यभरात अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान सेवा देण्यासाठी निरंतर कटिबद्ध राहील. या मतदारसंघातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यांचे आभार मानतो."
 
- महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
 
 




संबंधित मजकूर