मुंबई : (MPSC Paper Leak Allegation) नीट पेपरफुटी प्रकरणाचा वाद शांत होत नाही तोच महाराष्ट्रात एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांवरून सोमवारी, राज्यात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पेपरफुटी झाल्याचा दावा केला. यात त्यांनी काही खासगी संस्थांवर गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र, अवघ्या काही वेळातच रोहित पवारांचे हे दावे फोल ठरलेत.
रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन देत औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर फिरल्याचा दावा करत काही उमेदवारांकडून मिळालेली माहिती, स्क्रीनशॉट्स आणि अन्य कागदपत्रांचा आधार घेत गंभीर आरोप केले. एवढेच नव्हे, तर दि. २२ मार्च रोजी परीक्षा होती आणि परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजेच २० मार्च रोजी काही उमेदवारांच्या मोबाईलवर प्रश्न आले आणि यातील एका प्रश्नपत्रिकेची किंमत १२ लाख होती, असा दावा त्यांनी केला.
मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळातच हा पेपरफुटीचा दावा खोटा असल्याची माहिती पुढे आली. ज्या मुलाने पेपर फुटल्याचा ई-मेल केला होता, त्यानेच नंतर ही तक्रार बनावट असल्याची कबुली दिली. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचल्याचे त्याने सांगितले.(MPSC Paper Leak Allegation)
मात्र, रोहित पवार यांना कुणीतरी व्हॉट्सअॅप चॅट आणून दिल्यानंतर त्यांनी सवयीप्रमाणे लगेच त्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली. किमान लोकप्रतिनिधींनी तरी कुठल्याही आरोपांपूर्वी पुरेशी शहानिशा करणे अपेक्षित असते. मात्र, रोहित पवारांनी सीजेपीच्या आंदोलनानंतर उत्साहाच्या भरात या प्रकरणाचा गाजावाजा केला, पण नंतर तेच त्यांच्या अंगलट आले.(MPSC Paper Leak Allegation)
एमपीएससी परिक्षेचा घटनाक्रम काय?
दि. २२ मार्च रोजी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती पदासाठी परीक्षा पार पडली. या परीक्षेच्या दोन दिवस आधी २० मार्च रोजी एका मुलाने व्हॉट्सॲप ग्रुपवर एमपीएससीचा पेपर फुटल्याचा फेक मेसेज पसरवला. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर झाला. १ ते २१ जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. परंतू, ही यादी जाहीर होताच २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. आत एका मुलाने २० मार्च रोजी पेपर फुटल्याचा दावा केला. एमपीएससीने या तक्रारीची तातडीने दखल घेत पुरावे मागवले आणि तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावले. मात्र, २६ जुलैच्या रात्री तक्रारदार मुलाने एमपीएससीला दुसरा ई-मेल पाठवला. यात माझी पहिली तक्रार पूर्णपणे बनावट होती. परीक्षा पुन्हा वेळेत होणार नाही या भीतीपोटी आणि पुन्हा परीक्षा घेतली जावी, म्हणून मी मुद्दाम हा पेपरफुटीचा बनाव रचला होता, अशी कबुली त्याने दिली.(MPSC Paper Leak Allegation)
एमपीएससीचे म्हणणे काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "औषध निरीक्षक (गट ब) अन्न आणि औषध प्रशासन या संवर्गाच्या १५४ पदांसाठी दि. २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दि. १२ जून २०२६ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर दि. १ जुलै ते २२ जुलै या काळात पात्र असलेल्ला ४८८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली होती.
दि. २१ जुलै रोजी गौरव पाटील नावाच्या ईमेल आयडीवरून २२ मार्च रोजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे आणि तिचा लाभ एका उमेदवाराला झाल्याची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. त्यावेळी तक्रारीत पुरावे नसल्याने संबंधित तक्रारदाराला अधिकचे पुरावे सादर करण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानंतर गौरव पाटीलने २३ जुलै रोजी आयोगाच्या कार्यालयात इमेलद्वारे हे पुरावे सादर केले होते. या पुराव्यांच्या अनुषंगाने तपासणी सुरु असून दि. २७ जुलै रोजी तक्रारदार आणि तक्रारीत नमूद केलेला लाभार्थी उमेदवार या दोघांनाही आयोगाच्या कार्यालयात विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, हे दोघेही अनुपस्थित राहिले."(MPSC Paper Leak Allegation)
पोलिसात तक्रार दाखल करणार
"दरम्यान, काल संध्याकाळी प्राप्त झालेल्या ई-मेलनुसार या तक्रारदाराचा मित्र ऋषिकेश गांगर्डे हा परीक्षेत पास झालेला नसल्याने त्याने भ्रम निर्माण करण्यासाठी तक्रार केली असल्याचे सांगितले. त्या दोघांमध्ये झालेले चॅटिंग हे चेष्टेचे होते. त्यात कुठलीही प्रश्न पत्रिका फुटल्याचा दावा नसल्याचे त्यांनी ई-मेलमध्ये नमूद केले. आयोगाने हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. संबंधित तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, उमेदवाराचे म्हणणे तसेच इतर तक्रारदारांची निवेदने एकत्रित करून आम्ही संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करणार आहोत," असे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले.(MPSC Paper Leak Allegation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....