मुंबई : (Voter Registration) महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयर) कार्यक्रमांतर्गत विद्यमान मतदारांनी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ज्या पात्र मतदारांची नावे या यादीत नसतील किंवा नव्याने मतदार नोंदणी करावयाची असेल, त्यांना दि. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
याच कालावधीत मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना ८, तर चुकीच्या नोंदींवर हरकत घेण्यासाठी नमुना ७ सादर करता येणार असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. अर्जातील चुकीची माहिती किंवा खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत एक वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.(Voter Registration)
अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम २२ व २३ अंतर्गत मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया 'सातत्यपूर्ण अद्ययावत' पद्धतीने सुरू राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.(Voter Registration)