मुंबई (Farm Roads Tree Plantation Maharashtra) : राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी महसूल विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियान आणि सन २०४७ पर्यंत राज्याचे वन व वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शुक्रवारी, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
या शासन निर्णयानुसार, शेत किंवा पाणंद रस्त्यांवर वृक्षलागवड करण्यापूर्वी संबंधित रस्ते अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देऊन भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आलेले असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Farm Roads Tree Plantation Maharashtra)
राज्यातील सर्व शेत व पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा उपलब्ध जागेनुसार जिल्ह्याच्या कृषी-हवामान क्षेत्राला अनुरूप अधिसूचित प्रजातींची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्हा नियोजन समिती, खनिकर्म निधी, सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. (Farm Roads Tree Plantation Maharashtra)
ग्रामपंचायतींवर संगोपनाची जबाबदारी
वृक्षलागवडीनंतर किमान दहा वर्षे झाडांचे संगोपन, पाणीपुरवठा, पुनर्लागवड व संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. तसेच वृक्षलागवडीचे मूल्यांकन केवळ लावलेल्या रोपांच्या संख्येवर न करता, जिवंत राहिलेल्या रोपांचे प्रमाण, वृक्षांची वाढ, हरित आच्छादन आणि पर्यावरणीय परिणाम याच्या आधारे करण्यात येणार आहे. (Farm Roads Tree Plantation Maharashtra)
याशिवाय ग्रामपंचायत, शेतकरी गट, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळ, जनावरांची चराई, आग, कीड व रोगांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा जागा अपुरी असल्यास स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती निर्णय घेईल, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (Farm Roads Tree Plantation Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....