विविधांगी सह्याद्रीचा रक्षक

 
 
Ram Khurdal
 
दुर्गसंवर्धन, इतिहास, पत्रकारिता, पर्यावरण, ग्रामविकास आणि समाजजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत गेली तीन दशके सातत्याने कार्य करणार्‍या राम खुर्दळ यांच्याविषयी...
 
दुर्गसंवर्धन, इतिहास, पत्रकारिता, पर्यावरण, ग्रामविकास आणि समाजजागृती अशा विविध क्षेत्रांत गेली तीन दशके सातत्याने कार्य करणारे राम खुर्दळ हे नाशिक जिल्ह्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. दि. १५ जून १९७२ रोजी नाशिक जिल्ह्यातील गिरणारे येथे जन्मलेल्या राम खुर्दळ यांनी इतिहास विषयात ‘एमए’, पत्रकारिता, तसेच संवाद व लोकमाध्यमे या क्षेत्रांतील शिक्षण घेतले. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाची सांगड प्रत्यक्ष सामाजिक कार्याशी घालत त्यांनी समाजहिताचा व्यापक ध्यास घेतला.
 
राम खुर्दळ हे ‘शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक’ जिल्ह्याचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. नोंदणीकृत असलेल्या या संस्थेला ‘नीती आयोग’, ‘दर्पण’, तसेच ‘१० अ’ व ‘१२ अअ’ मान्यता प्राप्त आहे. सन २००१ पासून त्यांनी सह्याद्री, सातमाळा, सातपुडा, डोलबारी आणि सालबारी पर्वतरांगांतील २२२हून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. दुर्लक्षित गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे मॅपिंग, प्राचीन जलस्रोतांची स्वच्छता, होळकरकालीन बारवांचे पुनरुज्जीवन, शिवकालीन तळी व विहिरी गाळमुक्त करणे, प्राचीन मंदिरे, समाधीस्थळे आणि वीरगळ यांचे जतन अशा अनेक उपक्रमांत त्यांनी श्रमदानातून मोलाचे योगदान दिले. विशेषतः किल्ले रामशेजवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मोहिमांमधून त्यांनी किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वास्तूंची स्वच्छता, परिसर प्लास्टिकमुक्त करणे, ऐतिहासिक अवशेषांचे जतन, पायवाटा मोकळ्या करणे, तसेच दुर्गप्रेमींसाठी माहितीफलक, नकाशे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राची माहिती उपलब्ध करून दिली आहेत.
 
तसेच साल्हेर महादुर्गाच्या संवर्धनासाठी विविध संस्थांना एकत्र आणत त्यांनी ‘दुर्ग साल्हेर महादुर्ग संवर्धन मोहिमे‘चे नेतृत्व केले. पर्यावरण संरक्षण हे त्यांच्या कार्याचे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र. जिल्हाधिकारी नियुक्त पर्यावरण कृती दलाच्या टास्क फोर्सचे सदस्य म्हणून जंगलतोड रोखणे, वणवे विझविणे, वन्यजीव व पक्षीसंवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण, यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
 
२०२२ मध्ये त्यांच्या कृती दलाने नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लागलेले वणवे विझवून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केले. पत्रकारिता क्षेत्रातही राम खुर्दळ यांचे योगदान लक्षणीय आहे. १९९० पासून त्यांनी विविध वृत्तपत्रांत वार्तांकन आणि वैविध्यपूर्ण लेखनही केले. सामाजिक प्रश्न, ग्रामीण विकास, इतिहास, पर्यावरण आणि जनजागृती या विषयांवरील त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील मानले जाते. सध्या ते ‘पत्रकार संरक्षण समिती’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांनी वारकरी चळवळीतही सक्रिय सहभाग नोंदवला. गेली २० वर्षे वारकरी महामंडळाचे प्रचारप्रमुख म्हणून संतपरंपरा, वारी, व्यसनमुक्ती, गोसंवर्धन, नदीप्रदूषणमुक्ती आणि वारकर्‍यांच्या प्रश्नांवर ते जनजागृती करत आहेत. तसेच सकल मराठा समाजाचे प्रवक्ते, वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि ‘शेतकरी वाचवा’ अभियानाचे मुख्य संयोजक म्हणूनही त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावी नेतृत्व केले आहे. ‘यशदा, पुणे’ यांच्या माध्यमातून ते ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि विविध योजनांतील लाभार्थींना नेतृत्व, वक्तृत्व, ग्रामविकास, शाश्वत पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, दुर्गसंवर्धन आणि ग्रामविकास अशा विषयांवर प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी शेकडो प्रशिक्षण सत्रे, व्याख्याने आणि वेबिनारद्वारे हजारो नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी करण्यात आला आहे.
 
उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक पत्रकार, ‘वसुंधरा’ पुरस्कार, ‘रायगड प्राधिकरणा’चा ‘दुर्गसंवर्धन सन्मान’, ‘रोटरी क्लब’चा सामाजिक क्षेत्र पुरस्कार, ‘परिवारभूषण’, ‘सह्याद्रीमित्र सन्मान’, ‘समाजभूषण - २०२६’, ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ’ पुरस्कार आणि ‘लोकरत्न सन्मान’ यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मात्र, हे पुरस्कार म्हणजे कार्याला मिळालेली प्रेरणा असून, समाजसेवेचा प्रवास अधिक जोमाने सुरू ठेवण्याची ऊर्जा असल्याचे ते मानतात. इतिहासाचा अभ्यास, दुर्गसंवर्धनाची तळमळ, पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव यांचा सुंदर संगम म्हणजे राम खुर्दळ!
 
आपल्या निःस्वार्थ कार्यातून त्यांनी दुर्ग, पर्यावरण आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ केले असून, भावी पिढीसाठी इतिहास आणि निसर्गसंवर्धनाची प्रेरणादायी परंपरा निर्माण करणार्‍या सह्याद्रीच्या या रक्षकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर