अवघी दुमदुमली पंढरी...घोष चाले महाद्वारी; विठुरायाच्या भेटीस २० लाखांहून अधिक वारकरी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शासकीय महापूजा

 

Ashadhi Ekadashi 2026
पंढरपूर : (Ashadhi Ekadashi 2026) "अवघी दुमदुमली पंढरी... घोष चाले महाद्वारी..." संत चोखामेळा यांच्या या अभंगातील शब्द आज अक्षरशः पंढरपूरच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून साकार झाले आहेत. विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण पंढरीनगरी दुमदुमून गेली असून भक्ती, श्रद्धा आणि समतेचा महासंगम आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.
 
देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवड आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संतांच्या सर्व पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "राम कृष्ण हरी" या नामघोषात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. यंदा २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याने चंद्रभागेचा तीर भक्तीच्या महासागराने भरून गेला आहे. (Ashadhi Ekadashi 2026)
 
 
 
संत चोखामेळा यांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि वैष्णवांचा मेळा विठ्ठलाच्या चरणी लीन झाल्याची अनुभूती आजच्या वारीतही प्रत्येक वारकऱ्याला येत आहे. रिंगण, कीर्तन, भारुड, हरिपाठ आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने पंढरीचे वातावरण चैतन्यमय झाले आहे. (Ashadhi Ekadashi 2026)
 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले असून मध्यरात्रीनंतर २.२० वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा, रात्री ३ वाजता श्री रुख्मिणीमातेची शासकीय महापूजा आणि पहाटे ४.३५ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. (Ashadhi Ekadashi 2026)
 
विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग पाच किलोमीटरहून अधिक लांब गेली असून दर्शनासाठी २० ते २२ तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी १० हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या 'संवाद वारी' प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देत "भक्ती आणि प्रगतीचा संगम" घडवणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. यंदाची आषाढी वारी केवळ धार्मिक सोहळा नाही, तर संत परंपरेने दिलेल्या समता, सेवा आणि भक्तीच्या संदेशाचा जिवंत उत्सव ठरत आहे. (Ashadhi Ekadashi 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर