मुंबई : (Ramayanam) रामायणम् या बहुप्रतिक्षित चित्रपटात सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी साई पल्लवीच्या निवडीबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
दीपिका चिखलिया यांनी सांगितले की, त्यांनी साई पल्लवीचा अभिनय पाहिला असून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मात्र, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी कितपत प्रभावी वाटेल, याचा निर्णय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच घेता येईल. आताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी पुढे सांगितले की, तुलसीदासांच्या रामायणामध्ये सीतेच्या रूपाचे, डोळ्यांचे, उंचीचे, केसांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यात आले आहे. रामानंद सागर यांनी त्या वर्णनाशी सुसंगत अभिनेत्रीची निवड केली होती. त्यामुळे नव्या चित्रपटातील कलाकारही त्यांच्या भूमिकांना न्याय देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.रावणाची भूमिका साकारणाऱ्या यश यांच्या अभिनयावरही दीपिका यांनी विश्वास व्यक्त केला ते या.(ramayanam)
भूमिकेला योग्य न्याय देतील, असे त्यांनी म्हटले. मात्र, जुन्या रामायण मालिकेच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या असल्याने नव्या चित्रपटाची तुलना होणारच, असेही त्यांनी नमूद केले.साई पल्लवीच्या लूकबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना दीपिका म्हणाल्या की, त्यांच्या माहितीप्रमाणे रामायणात सीतेच्या कुरळ्या केसांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे केवळ लूकच्या आधारे मत बनवण्यापेक्षा संपूर्ण चित्रपट पाहणे महत्त्वाचे आहे.दीपिका यांनी त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीबाबतही खुलासा केला. रामायण मालिकेनंतर सीतेची प्रतिमा इतकी लोकप्रिय झाली की त्यांना वेगळ्या भूमिका मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे पुढे त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणम् या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता, तर यश रावण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.(ramayanam)