मुंबई (Mumbai Police Viral Protest Video) : दादर शिवाजीपार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकाला पोलिस अधिकाऱ्याने कथितरीत्या गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांवर तीव्र टीका केली. मात्र, या आरोपांना मुंबई पोलिसांनी तत्काळ उत्तर देत व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला आहे.
आमदार वर्षा गायकवाड यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये, "मुंबई पोलिसांचे हे वर्तन काय आहे? एका पुरुष पोलिसाने तरुण महिला आंदोलकाशी अशी झटापट का केली? महिला पोलिसांकडे हे काम का सोपवले नाही? या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?" असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले होते. (Mumbai Police Viral Protest Video)
यावर मुंबई पोलिसांनी अधिकृत 'एक्स' हँडलवरून प्रत्युत्तर देताना म्हटले की, "या घटनेचा बेजबाबदारपणे विपर्यास केला जात आहे. संबंधित अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखताना एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी संबंधित महिला आंदोलक नकळत त्यांच्या आणि त्या पुरुष आंदोलकाच्या मध्ये आली. अधिकारी दुसऱ्या दिशेला पाहत असल्याने हा प्रसंग घडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ आणि सर्व बाबींची पडताळणी केली असून वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी तथ्यांची खात्री करणे अपेक्षित आहे." (Mumbai Police Viral Protest Video)
Ma’am, please note, this is being irresponsibly misinterpreted- the official, while managing law & order there, was trying to hold on to a male protestor when a lady unknowingly stepped in between, while he was looking away- Being a public figure, you are expected to verify… https://t.co/xwVqirsYf1
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) July 24, 2026
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. "हा व्हिडिओ पाहून डोक्याची तिडीक उठली. हा कोण नराधम आहे? आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी तो किळसवाणे कृत्य करत आहे. हा पोलीस असेल तर त्याला तात्काळ निलंबित नव्हे, तर पोलीस दलातून बडतर्फ करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिष्ठेला अशा घटनांमुळे धक्का बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mumbai Police Viral Protest Video)
या प्रकरणामुळे आंदोलनातील व्हिडिओ, त्याचा संदर्भ आणि सोशल मीडियावरील राजकीय प्रतिक्रिया या पोलीस विभागाकडून घटना तपासल्या जात असून मुंबई पोलिसांकडून सर्वत्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (Mumbai Police Viral Protest Video)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.