मुंबई (CJP Protest Foreign Link Allegations): 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचे विदेशी कनेक्शनचे दावे सोशल मीडियावरून समोर येत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला आहे. ऑनलाइन पेज म्हणून सुरू झालेला हा उपक्रम काही दिवसांतच दिल्लीतील मोठ्या आंदोलनात आणि हिंसक घटनांमध्ये कसा परिवर्तित झाला, याचा शोध घेतला जातो आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, सुरुवातीला विनोदी किंवा व्यंगात्मक स्वरूपात सुरू झालेल्या एका ऑनलाइन पेजने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर युवकांना आकर्षित केले. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन उभे राहिले. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने लाठीचार्ज व तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या संपूर्ण घडामोडींचा घटनाक्रम, त्यामागील नियोजन आणि सोशल मीडियाचा वापर यांची सखोल चौकशी सुरू आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या अनेक व्यक्ती विद्यार्थी नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. हिंसाचारात बाहेरील व्यक्ती किंवा इतर घटक सहभागी होते का, याचाही तपास केला जात आहे. तपास यंत्रणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, व्हिडिओ, संदेश आणि विविध अकाउंट्सच्या हालचालींचे विश्लेषण करत आहेत. काही संशयास्पद हँडल्सद्वारे दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तसेच काही सोशल मीडिया अकाउंट्स पाकिस्तानमधून चालवले जात असल्याचा प्राथमिक संशय तपासात व्यक्त करण्यात आला असून, त्याची पडताळणी सुरू आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
केंद्र सरकारच्या आदेशानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत एक्स अकाऊंट खाते ब्लॉक करण्यात आले होते. मात्र काही मिनिटांतच "कॉकरोच इज बॅक" या नावाने नवे खाते सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय, इन्स्टाग्रामवरही या पेजचे फॉलोअर्स झपाट्याने वाढल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी या खात्याचे फॉलोअर्स सुमारे २.३ कोटींवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून, त्याच माध्यमातून पुन्हा आंदोलनासंदर्भातील संदेश आणि प्रचार सुरू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
अभिजित दिपके 'आयएसआय-पेड असेट'?
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अभिजित दिपके विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये २०१९ मधील पुणे पोलिसांच्या नोंदींचा हवाला देत, दिपके यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा दावा केला आहे. बग्गा यांनी म्हटले आहे की, बोस्टन (अमेरिका) येथे वास्तव्यास असलेल्या अभिजीत दिपके याची २०१९ मध्ये पुणे पोलिसांच्या नोंदींमध्ये कथितरित्या 'आयएसआय-पेड असेट' म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिपके पाकिस्तानच्या काश्मीरविषयक कथनाला चालना देणे आणि भारतविरोधी प्रचार पसरविण्याच्या कार्यात सहभागी असल्याचा आरोप त्या तक्रारीत करण्यात आला होता. बग्गा यांनी आपल्या पोस्टसोबत लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने पुणे पोलिस आयुक्तांना २०१९ मध्ये दिलेल्या कथित तक्रारीची प्रतही शेअर केली आहे. या तक्रारीच्या आधारे त्यांनी अभिजीत दिपके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
पन्नूकडून सीजेपीला १० लाख अमेरिकन डॉलर्सचा पाठींबा
प्रतिबंधित खलिस्तानी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने (सीजेएफ) सीजेपीच्या आंदोलनाला आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्याचे निदर्शनास आले आहे. सीजेएफच्या समाज माध्यमांवरील पोस्टनुसार संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने सीजेपीच्या आंदोलनाला १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ९.६ कोटी रुपये) देण्याचे जाहीर केले आहे. ही मदत मोदी सरकार आणि भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी आणि आगामी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात अडथळा आणण्यासाठी दिली जात असल्याचा दावा त्याने केला आहे. तरुणांना भारतविरोधी कारवायांमध्ये ओढण्यासाठी आणि देशात शांतताभंग करण्यासाठी एसएफजेकडून हा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती आहे की पन्नूने ही मदत मिळवण्यासाठी दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. एसजेएफने, १५ ऑगस्ट हा दिवस विद्यार्थ्यांसाठी किंवा शीखांसाठी स्वातंत्र्यदिन नसल्याचा दावा केला आहे. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या अधिकृत स्वातंत्र्यदिन सोहळ्यात आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याची धमकी पन्नूने दिली आहे. यानंतर, १६ ऑगस्ट रोजी इंडियानापोलिस येथे 'पंजाबला मुक्त करण्यासाठी' जनमत संग्रह आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
सीजेपी आंदोलनाचे वार्तांकन पाकिस्तानातील काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रमुखत्वाने करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या वार्तांकनातून भारतातील राजकीय परिस्थिती, शिक्षण व्यवस्था आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत विविध मते आणि विश्लेषणे मांडण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील काही प्रमुख टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांनी सीजेपी आंदोलनाला त्यांच्या प्राइम-टाइम चर्चांमध्ये स्थान दिले. या चर्चांमध्ये आंदोलनामुळे भारत सरकारवर दबाव निर्माण झाल्याचा दावा करण्यात आल्याचे म्हटले जाते. तथापि, भारत सरकारने अधिकृतपणे आंदोलनाच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचे कोणतेही निवेदन दिलेले नाही.(CJP Protest Foreign Link Allegations)
ठाकरे बंधूंचे 'अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स'
'अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स' ही संकल्पना प्रामुख्याने संविधानिक मार्गाने किंवा निवडणुकांद्वारे सत्ता मिळवणे कठीण वाटल्यानंतर विकसित करण्यात आलेली एक रणनीती म्हणून ओळखली जाते. मग अशा राजकीय पक्षांकडून अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स खेळत संविधानिक संस्थांऐवजी सामाजिक कार्यकर्ते (एक्टिव्हिस्ट) आणि स्वयंसेवी संस्थांना जनतेच्या समस्या सोडवणारे खरे 'भाग्यविधाते' म्हणून सादर केले जाते. जनतेच्या मनात असा भ्रम निर्माण केला जातो की राजकीय व्यवस्था किंवा लोकशाही संस्थांपेक्षा हे कार्यकर्तेच त्यांचे खरे हितचिंतक आहेत. जेव्हा अशा पर्यायी चळवळींमधून एखादे आंदोलन उभे राहते तेव्हा ज्या राजकीय पक्षांना किंवा नेत्यांना सध्याच्या राजकारणात स्थान उरलेले नाही, ते या आंदोलनांचा आणि 'अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स'चा पाठिंबा म्हणून वापर करतात. अशा प्रकारे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नागरी आंदोलनांचा आणि बिगर-राजकीय मुखवट्यांचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचे तर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशाच प्रकारचे अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स खेळून कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे.(CJP Protest Foreign Link Allegations)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक