मुंबई(Bharat Taxi Maharashtra):देशातील सहकार क्षेत्रात नवे परिवर्तन घडविणाऱ्या 'भारत टॅक्सी' उपक्रमाचा महाराष्ट्रात अधिकृत शुभारंभ गुरुवार, दि.२३ जुलै रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत टॅक्सीच्या सारथींना प्रातिनिधिक स्वरूपात किट आणि शेअर सर्टिफिकेटचे वितरण केले. तसेच विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.(Bharat Taxi Maharashtra)
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.(Bharat Taxi Maharashtra)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशात सहकार क्षेत्राला नव्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. गावातील सहकारी संस्थांपासून ते मोठ्या व्यवसायांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून रोजगार आणि समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, 'भारत टॅक्सी' हा त्याच परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा आहे.(Bharat Taxi Maharashtra)
'चालकच होणार सहकारी संस्थेचा मालक'
फडणवीस म्हणाले की, ओला-उबरसारख्या अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना सुविधा मिळाल्या असल्या, तरी टॅक्सी चालकांना त्याचा अपेक्षित आर्थिक लाभ मिळाला नाही. सर्ज प्रायसिंगचा फायदा चालकांऐवजी कंपन्यांनाच मिळत राहिला. चालकांना मोठ्या प्रमाणावर कमिशन द्यावे लागते आणि त्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. भारत टॅक्सीमध्ये चालक हा केवळ चालक राहणार नाही, तर तो सहकारी संस्थेचा मालक आणि भागधारकही असेल. संस्थेचा नफा लाभांशाच्या स्वरूपात चालकांपर्यंत पोहोचेल. यामध्ये सर्ज प्रायसिंग किंवा लपविलेले शुल्क (हिडन कॉस्ट) नसून, अत्यल्प सेवा शुल्कात पारदर्शक सेवा दिली जाईल."(Bharat Taxi Maharashtra)
भूमिपुत्रांना रोजगाराची मोठी संधी
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वर्गीय दिबा पाटील सहकारी वाहतूक संघासोबत झालेल्या कराराचा विशेष उल्लेख केला. या कराराअंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील तीन ते चार हजार भूमिपुत्रांना बँक कर्जाच्या माध्यमातून टॅक्सी उपलब्ध करून देत 'भारत टॅक्सी' प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Bharat Taxi Maharashtra)
'मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा'
मुंबई ही सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत जगातील पहिल्या २० शहरांमध्ये असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, या स्थानाला अधिक बळकटी देण्यासाठी अॅप-आधारित टॅक्सी सेवाही उच्च दर्जाच्या असणे आवश्यक आहे. भारत टॅक्सीच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला असून, चालकांच्या वर्तनापासून भाडे रचनेपर्यंत सर्व बाबींमध्ये स्पष्टता असेल.(Bharat Taxi Maharashtra)
२०३० पर्यंत नवी मुंबई विमानतळ देशातील सर्वात मोठे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०३० पर्यंत हे विमानतळ देशातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल. अशा महत्त्वाच्या विमानतळावर भारत टॅक्सी सेवेला सुरुवात होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.(Bharat Taxi Maharashtra)
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत टॅक्सीच्या पहिल्या सारथींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अक्षय केणी, सूरज नाईक, तुषार पाटील, मिलिंद पाटील, सिद्धार्थ कर्वे, सुदर्शन म्हात्रे आणि रोहिदास गायकवाड यांना प्रातिनिधिक स्वरूपात किट आणि शेअर सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.(Bharat Taxi Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.