मुंबई : (Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme) राज्यातील लाखों शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस वेग आला असून बुधवारी, ५३३ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही पहिली यादी जाहीर केली.
यावेळी बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीस आजपासून सुरुवात करत आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून राज्यातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. तसेच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांनादेखील २ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे."(Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme)
केंद्र सरकारकडे ७ लाख ४८ हजार ४९६ करदात्या शेतकऱ्यांची यादी पाठवली असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्यावर उत्तर येणे अपेक्षित आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात येईल. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना ४० हजार ९८० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांची ७ लाख ४८ हजार ४९६ शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवली असून केंद्रासोबत समन्वय सुरु आहे. आयकर विभागाकडून डेटा आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येईल. येत्या दोन ते तीन दिवसांत ही माहिती प्राप्त होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.(Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme)
पात्र ५३३ शेतकऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी
अमरावती ५८
लातूर १३३
नागपूर १६
पुणे ८५
सातारा ३८
सोलापूर २१
ठाणे १८२
एकूण ५३३
'त्या' शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची ७ लाख ४८ हजार ४९६ करदात्या शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठवली आहे. आम्ही केंद्रासोबत दररोज समन्वय साधत आहोत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाशी थेट संपर्क सुरु असून त्यांचे सहकार्य आहे. आमचा करार झाला असून डेटा पुढे सरकवण्यास सुरुवात झाली आहे. कदाचित उद्यासुद्धा संपूर्ण माहिती मिळू शकेल. आमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ कर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय शिल्लक आहे. शेतीबाह्य उत्पन्नातून प्राप्तिकर भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून अशा शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर शेतकरी 'आपले सरकार' केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करतील. तसेच ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक वर नोंदणी नसेल त्यांची नोंदणीही केली जाईल. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.(Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme)
२ लाखांच्या वर कर्जधारकांना ३१ मार्चपर्यंत मुदत
२ लाखांहून अधिक कर्ज असलेले २.९० लाख शेतकरी असून त्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत २ लाखांच्या वर असलेली रक्कम भरण्याची मुदत दिली आहे. ती रक्कम भरल्यानंतर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणारे २३.६३ लाख शेतकरी असून त्यांना ५० हजार रुपये प्रोत्सहनपर लाभ देण्यात येणार आहे.(Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme)
कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज
आतापर्यंत कर्जमाफी झाली तेव्हा शेतकऱ्याला पुन्हा कर्ज मिळत नव्हते. परंतू, यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकऱ्याला लगेच कर्ज वितरित करण्याची सक्ती करण्यात आली आहे. २०२६-२७ साठी पीक कर्ज पुरवण्याचा ९५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात खरीप पीककर्ज ५२ हजार ८८२ कोटी रुपये तर, रब्बीसाठी २२ हजार ६२७ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे.
६४ लाख शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा लक्षांक आहे. आतापर्यंत ५६ टक्के शेतकऱ्यांना २९ हजार ४१० कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यावेळी पाऊस उशीरा झाल्याने खरीप हंगाम उशीरा सुरु झाला आहे. त्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतरही शेतकरी कर्ज घेऊ शकणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून जवळजवळ ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनरूज्जीवन करून शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.(Ahilya Devi Holkar Farmer Loan Waiver Scheme)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....