कोल्हापूरच्या नावे बुरशीच्या नव्या प्रजातीचे नामकरण; भुदरगडमध्ये आढळली नवी बुरशी

    23-Jul-2026   

fungi from kolhapur



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधून बुरशीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (fungi from kolhapur). पॉलीपोर म्हणजेच ब्रॅकेट बुरशीमधील 'मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस' (Microporellus kolhapurensis) ही जगासाठी नवी प्रजाती संशोधकांनी शोधून काढली आहे (fungi from kolhapur). कोल्हापूर जिल्ह्यावरुन नामकरण केलेल्या या बुरशीचा उलगडा राजाराम महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधकांनी केला आहे. (fungi from kolhapur)
 

 

'मायक्रोपोरेलस या बुरशीच्या वंशामध्ये जगभरात सध्या सुमारे ३६ मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. भारतातून या वंशावरील संशोधन अत्यल्प असून, महाराष्ट्रातून यापूर्वी 'मायक्रोपोरेलस ओबोव्हेटस या प्रजातीची नोंद झाली होती. मात्र, आता कोल्हापुरातून या कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. राजाराम महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली पाटील व संशोधक विद्यार्थी योगेश पाटील यांनी हा शोध लावला आहे. नेलुम्बो' या भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या संशोधन नियतकालिकामध्ये यासंबंधीचे संशोधन प्रकाशित झाले आहे. भुदरगड तालुक्यातील बेडीव (आजरा सीमेवर) परिसरात कुजणाऱ्या लाकडावर संशोधकांना ही प्रजात आढळून आली. कोल्हापूरात ही प्रजात आढळल्याने तिचे नामकरण कोल्हापुरेन्सिस असे करण्यात आले आहे.

 
fungi from kolhapur


ही बुरशी जुलै ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीतच फळधारणा करते. ती जमिनीवर, विशेषतः झाडांच्या मुळांशी संबंधित अधिवासात एकटीच वाढताना आढळते. संशोधकांच्या मते ही सॅप्रोट्रॉफिक बुरशी असून मृत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून जंगलातील पोषकद्रव्यांचे पुनर्चक्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ही प्रजाती तिच्या जवळच्या प्रजातींशी साम्य दर्शवित असली, तरी तिची मोठी छिद्रे, अश्रूच्या आकाराचे बीजाणू, जमिनीवरील अधिवास, बाजूचा दांडा आणि विशिष्ट सूक्ष्मरचना यांमुळे ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

बुरशीची ठळक वैशिष्ट्ये -

  • पिवळसर-केशरी ते करड्या-तपकिरी रंगाची छत्राकृती रचना.
  • बाजूला दांडा (Laterally stipitate) असलेली वाढ.
  • जमिनीवर वाढणारी (Terrestrial) प्रजाती.
  • छिद्रे (Pores) मोठी असून एका मिलिमीटरमध्ये २ ते ४.
  • अश्रूच्या आकाराचे (Tear-shaped) बीजाणू.
  • विशिष्ट प्रकारची जाड भित्तीची सिस्टिडिया (Cystidia).




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर