महाराष्ट्रात 'या' हरणटोळ सापाच्या अधिवासाचा झाला विस्तार; ३ जिल्ह्यांत आढळल्या नव्या नोंदी

    23-Jul-2026   
Ahaetulla laudankia in Maharashtra


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्रातील तुलनेने अल्पपरिचित आणि अत्यंत सडपातळ अशा लौडांकिया हरणटोळ (Ahaetulla laudankia) सापाच्या वितरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे (Ahaetulla laudankia in Maharashtra). नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमधून या प्रजातीच्या दहा नव्या नोंदी करण्यात आल्या आहेत (Ahaetulla laudankia in Maharashtra). त्यामुळे उत्तर पश्चिम घाटातील या सापाचा अधिवास पूर्वीच्या समजुतीपेक्षा अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ahaetulla laudankia in Maharashtra)
 
 
तपकिरी रंगाच्या लौडांकिया हरणटोळ या प्रजातीचे शास्त्रीय वर्णन २०१९ मध्ये करण्यात आले होते. सुरुवातीला ओडिशा आणि राजस्थान येथून या सापाची नोंद झाली होती. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रातील पालघर परिसरातूनही त्याची उपस्थिती नोंदविण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील वितरण, अधिवास आणि पर्यावरणीय वैशिष्ट्यांबाबत माहिती अत्यंत मर्यादित होती. यासंदर्भात संशोधकांनी सर्पमित्रांकडील माहिती, सापाच्या बचाव मोहिमा आणि सिटीझन सायन्सद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे लौडांकिया हरणटोळ या सापाचा अधिवास पश्चिम महाराष्ट्रातही असल्याची नोंद केली आहे. हे संशोधन वन्यजीव संशोधक अमित सय्यद आणि चैतन्य शुक्ला यांनी केले असून ते झू प्रिंट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. नवीन संशोधनामुळे पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील नोंदी समोर आल्याने या सापाच्या वितरणातील महत्त्वाची भौगोलिक माहिती समोर आली आहे.
 
 
संशोधकांनी २०१४ ते २०२६ या कालावधीत मिळालेल्या एकूण दहा नोंदींचा अभ्यास केला. त्यामध्ये चार सापांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले, तर उर्वरित सहा नोंदी सर्पमित्र, बचाव मोहिमा आणि सिटीझन सायन्सव्दारे मिळालेल्या छायाचित्रांवर आधारित पडताळण्यात आल्या. प्रत्येक नोंदीची ओळख शरीरावरील खवले, रंगसंगती, त्वचेचा विशिष्ट उपांग, पोटावरील तांबूस-केशरी रंग आणि पांढऱ्या मध्यरेषेच्या आधारे निश्चित करण्यात आली. या नोंदींमुळे हा साप केवळ किनारी भागापुरता मर्यादित नसून सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशातही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भिरा (रायगड), पोलादपूर (रायगड), येवलेवाडी, कात्रज (पुणे), कोकणीपाडा (ठाणे), पुणे शहरातील विविध पाच ठिकाणे आणि बदलापूर (ठाणे) मधून या नोंदी करण्यात आल्या.
 
 
ठाण्यातील विशेष नोंद
संशोधनादरम्यान ठाण्यातील कोकणीपाडा येथे आढळलेला हा प्रौढ साप सुमारे १.७३७ मीटर लांबीचा होता.
संशोधकांच्या मते, या प्रजातीसाठी ही आतापर्यंतच्या उल्लेखनीय कमाल लांबींपैकी एक नोंद आहे. तथापि, ही बाब
निश्चित करण्यासाठी आणखी क्षेत्रीय अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
हजार मीटरवरील अधिवास
या संशोधनातील सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे या प्रजातीची अधिवास सहनशीलता. हा साप समुद्रसपाटीपासून अवघ्या २९ मीटर उंचीवरील बदलापूर येथे तसेच ९८६ मीटर उंचीवरील पुण्यातील कात्रज परिसरात आढळला. त्यामुळे हा साप कमी उंचीच्या किनारी प्रदेशापासून डोंगराळ जंगलांपर्यंत विविध अधिवासांमध्ये राहू शकतो, असे संशोधनातून सूचित झाले आहे. या सापाच्या अनेक नोंदी नागरी व उपनागरी भागांमधून मिळाल्या आहेत. झाडांचे आच्छादन उपलब्ध असल्यास हा साप मानवी वस्त्यांच्या आसपासही टिकून राहू शकतो, असे संशोधकांचे मत आहे.यावरून शहरी विस्ताराच्या परिसरातही वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. - अमित सय्यद, संशोधक




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर