मुंबई : (Vehicle Scrapping Facility) मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई जिल्हाधिकारी आँचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(Vehicle Scrapping Facility)
देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत
राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर आदी ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग सुविधा उपलब्ध असल्या तरी मुंबई परिसरात अधिकृत केंद्र उपलब्ध नाही. मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने असून त्यामध्ये सुमारे १५ लाख चारचाकी, ३० लाखांहून अधिक दुचाकी आणि ५ ते ६ लाख व्यावसायिक वाहने आहेत. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असून यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि रस्त्यांवरील ताण वाढत असल्याने मुंबई महानगर भागात अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणानुसार २० वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने फिटनेस चाचणीत अपात्र ठरल्यास स्क्रॅपसाठी पात्र ठरतात. अशा वाहनांसाठी करसवलत, नोंदणी शुल्कात सूट, तसेच वाहनाच्या किंमतीच्या ४ ते ६ टक्क्यांपर्यंत स्क्रॅप मूल्य देण्याची तरतूद आहे. मुंबई शहरातील मोठ्या प्रमाणावरील बेवारस वाहनांकरिता अधिकृत स्क्रॅपिंग केंद्र उभारून बेवारस व निकामी वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.(Vehicle Scrapping Facility)
पीपीपी तत्त्वावर वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारा
मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्याचे निर्देश दिले. या केंद्रासाठी इच्छुक उद्योजकांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागविणे, मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबविणे तसेच परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.(Vehicle Scrapping Facility)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....