महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मागणी

    23-Jul-2026
Samagra Shiksha Dada Bhuse
 
मुंबई : (Samagra Shiksha Dada Bhuse) देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६ टक्के निधी येतो. याकडे लक्ष वेधत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रपुरस्कृत योजनांच्या आढाव्यासाठी आयोजित राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत महाराष्ट्रासाठी भरीव निधी वाढीची मागणी केली.
 
या परिषदेत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, "२०२५-२६ मध्ये देशाचा एकूण ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्प ८७,३६७ कोटी रुपये होता. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला २,६७३ कोटी रुपये आले आहेत. राज्यात एक लाखांहून अधिक शाळा, ७.५ लाखांहून अधिक शिक्षक आणि २.१० कोटींहून अधिक विद्यार्थी असून, मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांपासून गडचिरोली-नंदुरबारसारख्या दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत पसरलेल्या या अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा विचार निधी वाटपात व्हावा.राज्याच्या ८८ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पापैकी सुमारे ९४ टक्के रक्कम शिक्षकांचे वेतन व निवृत्तीवेतनावर खर्च होते. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी केंद्राच्या भक्कम पाठबळाची गरज आहे."(Samagra Shiksha Dada Bhuse)
 
"‘पीएम श्री’, ‘आदर्श’ आणि ‘क्लस्टर’ शाळा ही उत्कृष्टता केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना सध्या वाहतूक अनुदान केवळ ज्यांच्या जवळपास शाळाच नाही अशा विद्यार्थ्यांपुरते मर्यादित आहे. हे अनुदान या शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणजे ही केंद्रे खऱ्या अर्थाने प्रादेशिक उत्कृष्टता केंद्रे बनतील."असा प्रस्ताव भुसे यांनी मांडला.(Samagra Shiksha Dada Bhuse)
 
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'तील स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनातील केंद्रीय हिस्सा ६०० रुपयांवरून दोन हजार रुपये करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या परिषदेत केली. राज्यात या योजनेअंतर्गत सुमारे १,६४,५५८ स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. एप्रिल २०२३ पासून त्यांना वर्षातील १० महिन्यांसाठी दरमहा २,५०० रुपये मानधन मिळते. यात केंद्राचा हिस्सा अवघा ६०० रुपये, तर राज्याचा हिस्सा १,९०० रुपये आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे ४११.३८ कोटी रुपये खर्च करते.(Samagra Shiksha Dada Bhuse)
 
शिवचरित्राच्या अभ्यासक्रमातील समावेशाबद्दल आभार
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्याच्या केंद्र सरकार व एनसीईआरटीच्या निर्णयाबद्दल मंत्री भुसे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.(Samagra Shiksha Dada Bhuse)
 
 




संबंधित मजकूर