वन्यजीवांचे छायाचित्रण करणारे अनेक; परंतु छायाचित्रणाला केवळ छंद न मानता त्याला वन्यजीवसंवर्धनाचे प्रभावी माध्यम बनविणारे वन्यजीवप्रेमी म्हणजे एकनाथ मंडल. त्यांच्याविषयी...
नाशिकमधील एकनाथ मंडल यांनी गेल्या दशकभरात वन्यजीव छायाचित्रकार, माहितीपट निर्माते आणि संवर्धन कार्यकर्ते म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कॅमेर्याने केवळ दुर्मीळ वन्यजीवांचे दर्शन घडवले नाही, तर समाजाला निसर्गसंवर्धनाची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही केले.
दि. ८ जुलै १९९१ साली नाशिकमध्ये एकनाथ यांचा जन्म झाला. पेशाने व्यावसायिक असणारे त्यांचे वडील नारायण मंडल हे पक्ष्यांचे आवाज काढत असत. त्यामुळे वन्यजीवांविषयीचा जिव्हाळा घरातूनच लाभला. मात्र, २०१२ साली हातात पहिल्यांदा कॅमेरा घेऊन पक्ष्याचे छायाचित्र टिपल्यानंतर त्या प्रवासाला दिशा मिळाली. इलेट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या एकनाथ मंडल यांचा व्यावसायिक प्रवास तांत्रिक क्षेत्रातून सुरू झाला. मात्र, त्यांचे मन कायम जंगलात, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये आणि जैवविविधतेत रमले. मात्र, २०१५ मध्ये वडील नारायण मंडल यांच्या निधनानंतर एकनाथ यांना जंगलाची वाट सोडून आपल्या घरचा पारंपरिक व्यवसायाची कास धरावी लागली. मात्र, वन्यजीवांसंबंधीचे काम त्यांनी सुरूच ठेवले. सुरुवातीला छायाचित्रण हा त्यांचा छंद होता. पण, हाच छंद पुढे संवर्धनाच्या ध्येयात रूपांतरित झाला. २०१६ पासून एकनाथ व्यावसायिक छायाचित्रणात उतरले आणि त्यांनी वन्यजीव छायाचित्रणाला वैज्ञानिक दस्तऐवजीकरणाचे स्वरूप दिले.
त्यांच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे, दृश्य-कथन करणारी छायाचित्रे. माहितीपटांच्या माध्यमातून ते जंगलातील जीवन, जैवविविधतेचे महत्त्व आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची गरज अगदी प्रभावीपणे मांडतात. वनविभाग, स्वयंसेवी संस्था आणि संवर्धन क्षेत्रात कार्य करणार्या विविध संशोधन संस्थांसोबत त्यांनी अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. वन्यजीव बचाव मोहिमांचे दस्तऐवजीकरण, कॅमेरा ट्रॅपिंग, जैवविविधतेची नोंद, मानव-वन्यजीव संघर्षाचे निरीक्षण आणि जनजागृती हे त्यांच्या कार्याचे प्रमुख विषय आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश, जंगल आणि विविध परिसंस्थांमध्ये सातत्याने भटकंती करून अनेक दुर्मीळ प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. ‘पुणा स्किंक’, ‘भारतीय राखी लांडगा’, ‘ल्युसिस्टिक स्पॉटेड आऊलेट’, तसेच भारतीय गिधाडांचे दस्तऐवजीकरण या त्यांच्या उल्लेखनीय कार्यांपैकी काही बाबी आहेत. अशा नोंदी संशोधक आणि संवर्धन यंत्रणांसाठीही महत्त्वपूर्ण ठरतात.
त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत चर्चित उपक्रम म्हणजे ‘टग्या’ नामक बिबट्याचे दस्तऐवजीकरण. २०१९ पासून त्यांनी एका बिबट्याच्या जीवनप्रवासाचे सातत्याने निरीक्षण आणि दृश्य दस्तऐवजीकरण केले आहे. वनविभागानेही या कार्याची दखल घेतली आहे.
उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणार्या'Annual Water for Wildlife Project' मध्ये त्यांनी योगदान दिले. तसेच नाशिक गवताळ प्रदेशातील वन्यजीवांचे दीर्घकालीन दस्तऐवजीकरण, जैवविविधता सर्वेक्षण, जलपक्षी गणना, कॅमेरा ट्रॅप आणि ड्रोन प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांनी ‘इको-इको फाऊंडेशन’, ‘रेस्यू’ आणि ‘राह फाऊंडेशन’ या संस्थांमध्ये विविध जबाबदार्या सांभाळल्या. वन्यजीव बचाव मोहिमांचे दस्तऐवजीकरण, छायाचित्रण, व्हिडिओनिर्मिती, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती आणि संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे, या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या छायाचित्रणाला राष्ट्रीय स्तरावरही गौरव प्राप्त झाला आहे. २०२४ सालचा ‘सेन्चुरी एशिया वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, ‘फोटोथॉन’ आणि ‘कुंभथॉन’ छायाचित्र स्पर्धांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. हे पुरस्कार त्यांच्या कलात्मक दृष्टीचेच नव्हे, तर निसर्गाविषयीच्या समर्पणाचेही प्रतीक आहेत.
वन्यजीव छायाचित्रणाबरोबरच माहितीपटनिर्मिती हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र. ‘कान्हा राष्ट्रीय उद्याना’वरील माहितीपटासह विविध दृश्य प्रकल्पांद्वारे त्यांनी जंगलातील जीवन सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ मंडल यांच्या कार्याची खरी ताकद म्हणजे त्यांनी निसर्गाकडे केवळ छायाचित्रकाराच्या नजरेने पाहिले नाही, तर संवर्धन कार्यकर्त्याच्या जबाबदारीने पाहिले. प्रत्येक छायाचित्रामागे अभ्यास, प्रत्येक माहितीपटामागे संशोधन आणि प्रत्येक मोहिमेमागे निसर्ग जपण्याची तळमळ दिसून येते.
आजच्या पिढीतील अनेक तरुण वन्यजीव छायाचित्रणाकडे आकर्षित होत आहेत. अशा वेळी एकनाथ मंडल यांचा प्रवास त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरतो. कॅमेरा हा केवळ सुंदर दृश्य टिपण्याचे साधन नसून, जैवविविधतेच्या संरक्षणासाठी समाजाला जागृत करणारे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. निसर्गावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा संवर्धनाचा भागीदार असू शकतो. एकनाथ मंडल यांचे कार्य याच विचाराला बळ देणारे आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!