उद्धव ठाकरेंचे बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोद; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; आधी स्वत:चे आमदार, खासदार सांभाळा

    22-Jul-2026   
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरेंनी आपले आमदार, खासदार आणि नगरसेवक सांभाळावे. सत्ता उलथवण्याच्या बाता करणे एक प्रकारे विनोद आहे. २०२९ ला निवडणूका आहेत. त्यामुळे आता फक्त विकासाच्या राजकारणावर बोला. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल दोघेही घरी गेले आहेत, अशी टीका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
 
दिल्ली येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी एका राजीनाम्याने चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, असे वक्तव्य केले होते. यावर महसुलमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. (Chandrashekhar Bawankule)
 
बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील श्रीराम मंदिरात आयोजित श्री लक्ष्मी - नृसिंह महायज्ञ, महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Chandrashekhar Bawankule)
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेले सगळे काही उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. त्यांना जंतरमंतरवर कुणीही विचारत नाही. नागपूरच्या त्यांच्या आंदोलनात २०० लोकही नव्हते. त्यामुळे ही सगळी नौटंकी सुरु आहे. विद्यार्थ्यांनी मनस्तापातून मंत्र्यांचा राजीनामा मागितला हे मान्य आहे. पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे सुरु असलेले कट कारस्थान आणि राजकारण मान्य नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. परंतू, काँग्रेस किंवा अन्य नौटंकी करणाऱ्यांना बोलायचा अधिकार नाही." (Chandrashekhar Bawankule)
 
काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपरफूटी
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपरफूटी झाली. या पेपरफुटीचा आलेख गंभीर असून आता नौटंकी करणाऱ्यांनी हा आलेख तपासून घ्यावा. सरकारने पेपरफुटीच्या प्रकरणांकडे लक्ष द्यावे, हे मी मान्य करतो. सरकारने स्वत: हे प्रकरण शोधून काढून कारवाई केली. मात्र, काँग्रेसच्या काळात पेपरफुटी झाली तेव्हा कुणीही विचारले नाही. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेची दखल घेतली आहे. पेपरफुटीच्या घटना मान्य नाहीत. पण व्यवस्थेमुळे झालेल्या एखाद्या घटनेत मंत्र्यांना किंवा सरकारला दोषी धरत राजकीय आंदोलन करून विद्यार्थ्यांची माथी भडकवणे योग्य नाही. राहुल गांधी यांचे आंदोलन नौटंकी आहे. त्यांना काहीही स्कोप राहिला नसल्याने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे आंदोलन करत आहेत." (Chandrashekhar Bawankule)
 
फडणवीस यांचे नेतृत्व सर्व कर्तृत्वाने परिपूर्ण
 
"मागच्या ४० वर्षांपासून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहोत. देशातील नेतृत्वांचा विचार केल्यास महाराष्ट्राला मिळालेले फडणवीस यांचे नेतृत्व सर्व कर्तृत्वाने परिपूर्ण आहे. त्यांचे जीवनचरित्र मोठे आहे. त्यांच्यावर हजारों लेख लिहिले तरी कमी पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नरसिंह भगवानाची पूजा करून महायज्ञ करण्यात आले असून सर्व नागपूरकर भक्तीभावात लीन झाले आहेत. देवेंद्रजींना उदंड आयुष्य मिळो, त्यांचे जीवन मंगलमय राहो, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही त्यांच्या मनाला दु:ख पोहोचेल अशी कुठलीही घटना होऊ नये आणि महाराष्ट्राच्या समृद्धीकरिता त्यांनी प्रचंड शक्तीशाली बनू दे, अशी भावना या महायज्ञातील प्रत्येक आहुतीमागे आहे. या महायज्ञातून देवेंद्र फडणवीस अजून मोठ्या ऊर्जेने उजळून निघतील," अशा भावनाही मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केल्या. (Chandrashekhar Bawankule)
 
...हेच महाराष्ट्राचे संस्कार
 
"शरद पवार मोदीजींकडे कशासाठी गेले त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण हेच महाराष्ट्राचे आणि देशाचे संस्कार आहेत. विरोधी पक्षात असूनही आपण एकमेकांची भेट घेत असतो. त्यामुळे यात काही वेगळे आहे, असे मला वाटत नाही. राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पण कालपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असून बऱ्यापैकी पीके वाचली आहेत, याचा आनंद आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर