सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

    21-Jul-2026   
Public Ganeshotsav
 
मुंबई : (Public Ganeshotsav) सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या उपक्रमांतर्गत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
 
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या २३ जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.
 
सकाळी १० ते सायं ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अकादमीच्या यूट्युब वाहिनीवर उपलब्ध करून देण्यात येईल. जगभरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून करण्यात येत आहे. (Public Ganeshotsav)
 
यानिमित्ताने या वर्षीच्या महागणेशोत्सव उपक्रमांचा शुभारंभाही होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव विधायक उपक्रमांसह शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी उत्सवांचा इतिहास, उत्सव आणि सामाजिक भान,आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, विधायक स्वरूपातील कार्यकम संयोजन, नेतृत्व विकास या विषयांवर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात मुंबईतील ज्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्या केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळाच्या शतकोत्तर वाटचालीचा मार्गदर्शनपर आढावा घेण्यात येणार आहे. (Public Ganeshotsav)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर