पालघर : (Temple Marriage Acknowledgment) पालघर शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खानपाडा येथील एका मुस्लीम युवकाने शहरातीलच पीलेना नगर परिसरात राहणार्या एका १९ वर्षीय हिंदू मुलीला जाळ्यात ओढून, तिच्यासाठी हिंदू बनण्याचे खोटे आश्वासन दिले. मुंबईतील खार पूर्व येथील एका मंदिरात प्रशासनाची दिशाभूल करीत स्वतःचे हिंदू नाव नोंदवून लग्नसदृश पावती मिळवली आणि त्याद्वारे ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा डाव रचला. मात्र, मुलीच्या पालकांनी दाखविलेली तत्परता आणि हिंदू संघटनांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला असून मुलीला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील पीलेना नगर (मूळ गाव : धुकटण) येथे राहणार्या १९ वर्षीय तरुणीला पालघर खानपाडा येथील रहिवासी गुलजार अन्सारी याने आपल्या जाळ्यात ओढले होते. चार बहिणी आणि आईसोबत राहणार्या गुलजारची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही, तो महागडी ‘ह्यूंदाई वर्ना’ कार घेऊन फिरत असे. दरम्यान, मुलीच्या वागण्यातील बदल आणि या संपूर्ण प्रकाराची कुणकुण तिच्या आई-वडिलांना लागताच, त्यांनी तातडीने पालघर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद (विहिंप) यांच्याशी संपर्क साधला.
कार्यकर्त्यांनी तत्काळ पावले उचलत तरुणीची समजूत काढून तिला पुन्हा कुटुंबाच्या ताब्यात दिले. पीडित तरुणीच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. गुलजार अन्सारी हा अनेक चोरीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे मुलीच्या घरातील चोरीत त्याचाच हात असावा, अशी शयता पीडित कुटुंबाने वर्तविली आहे.या गंभीर घटनेनंतर पालघर बजरंग दलाचे मुकेश दुबे आणि ‘विश्व हिंदू परिषदे’चे श्रीपाद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रथम मनोर पोलीस स्टेशन आणि त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची भेट घेतली.
त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदू मंदिरात ‘निकाह’सारखा प्रकार घडवून आणणे, ही अत्यंत चिंताजनक बाब असून, संबंधित मंदिर प्रशासनाने कुठल्या आधारे ही लग्नसदृश पावती दिली, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (Temple Marriage Acknowledgment)
मंदिराच्या भूमिकेची चौकशी
खार पूर्व येथील ‘स्वयंभू श्री नर्मदेश्वर महादेव शिवलिंग मंदिर’ प्रशासनाने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे ही विवाहसदृश पावती दिली, याबाबत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. (Temple Marriage Acknowledgment)
‘शिवम’ असे नाव नोंदवून मिळवली विवाह नोंदणी सदृश पावती
गुलजार अन्सारीने तरुणीला मुंबईतील खार पूर्व, रेल्वे कॉलनी येथील ‘स्वयंभू श्री नर्मदेश्वर महादेव शिवलिंग मंदिर’ येथे नेले. तिथे त्याने आपले नाव ‘शिवम’ असे नोंदवत विवाह नोंदणी स्वरूपाची एक पावती मिळवली. या पावतीच्या आधारे नोंदणीकृत दस्तऐवज (रोटरी डॉयुमेंट) बनवून तो तरुणीसोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहण्याच्या तयारीत होता. (Temple Marriage Acknowledgment)
गंभीर, संतापजनक प्रकार
एका हिंदू मंदिरात निकाहसारखा प्रकार घडवून आणणे, हे अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. संबंधित मंदिर प्रशासनाचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे.