मुंबई : (Navnath Ban) "जनरल डायरने जशा निरपराध जनतेवर गोळ्या झाडल्या होत्या तसे जनरल लायर बनून खोटे बोलत दिशाभूल करण्याचे आणि अफवा पसरवण्याचे काम जनाब संजय राऊत, उबाठा गट, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीमार्फत केले जात आहे. त्यामुळे जनरल लायर म्हणूनच तुमची ओळख कायम राहील.पण देशातील जनता आणि तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याने तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याने काही फरक पडणार नाही. असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवार दि.२१ रोजी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा आ. चित्रा वाघ उपस्थित होत्या.
" विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षासाठीच्या आंदोलनात तुकडे तुकडे गॅंग कशी सहभागी झाली? पंतप्रधान नरेंद्र मोदीना मारहाण करू, अशा घोषणा या आंदोलनात का दिल्या जात आहेत ? कलम ३७० हटवल्याबद्दल या आंदोलनात का राग व्यक्त केला जात आहे? सिर्फ अल्लाह का नाम रहेगा, अशा घोषणा का दिल्या जातात ? प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत अशा पद्धतीची भाषा या आंदोलनात का होत आहे." अशा प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.(Navnath Ban)
"तुमचा आणि क्रांतीचा संबंध म्हणजे पत्राचाळ, खिचडी आणि कफन खरेदीत घोटाळा करणे. लोकांना तुरुंगात डांबणे हीच तुम्हाला क्रांती वाटते. देवाभाऊंच्या काळात मुंबईकरांची आणि महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण होताहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या क्रांतीकडे जातो आहे, हे आधी पहा."असेही बन यांनी राऊत यांना सुनावले. (Navnath Ban)
"संजय राऊत, तुमची प्रचंड इच्छा आहे की हा भारत बंद करून टाकू. पण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आधुनिक भारत आहे. पाकिस्ताननेही या भारताला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही पाकिस्तानच्या घरात शिरून त्यांना धडा शिकवला. आम्ही पाकिस्तानला घाबरलो नाही, आम्ही बांगलादेशला घाबरलो नाही. तुमच्यासारख्यांना तर आम्ही कधीच घाबरत नाही. या देशातील सजग जनतेला माहित आहे की इथे नेपाळसारखी, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत. परंतु तुमचे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही."असे बन यांनी ठणकावले.(Navnath Ban)