‘फॅब‌’ नव्हे, संपूर्ण परिसंस्था हवी!

    21-Jul-2026   

भारताने सेमीकंडक्टर उत्पादनाच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. मात्र, केवळ चिप कारखाने उभारून महासत्ता होता येत नाही. संशोधन, डिझाईन, उपकरणे, कौशल्य, कच्चा माल आणि पुरवठा साखळी यांची सांगड घालणारी संपूर्ण परिसंस्था उभी राहिली; तरच भारत डिजिटलयुगातील खऱ्या अर्थाने ‌‘चिप महासत्ता‌’ बनेल.

20व्या शतकात ज्या देशांकडे तेलसंपत्ती होती, त्यांनी जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर वर्चस्व गाजवले. 21व्या शतकात मात्र हे समीकरण पूर्णपणे बदलले असून, आज जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन सेमीकंडक्टर चिप्सवर चालते. स्मार्टफोनपासून उपग्रहांपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून क्षेपणास्त्रांपर्यंत, इलेक्ट्रिक वाहनांपासून सुपरकॉम्प्युटरपर्यंत अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू सेमीकंडक्टर आहे. म्हणूनच, अमेरिकेपासून चीनपर्यंत, तैवानपासून युरोपीय महासंघापर्यंत प्रत्येक मोठी अर्थव्यवस्था आज चिप्सच्या शर्यतीत अब्जावधीची गुंतवणूक करत आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतानेही या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचा निर्धार केला. गुजरातमध्ये उभारले जाणारे सेमीकंडक्टर प्रकल्प, देशभर विकसित होणाऱ्या ‌‘ओएसएटी‌’ सुविधा, ‌‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन‌’ आणि सरकारी प्रोत्साहनांचे वाढते प्रमाण या घडामोडी, भारतासाठी सकारात्मक अशाच. काही वर्षांपूर्वीपर्यंत सेमीकंडक्टर उत्पादनात भारताचे नावही नव्हते. आज जगातील अग्रगण्य कंपन्या भारतात गुंतवणूकीस उत्सुक आहेत. भारतात सध्या सेमीकंडक्टरबद्दलची चर्चा कारखाने उभारण्यापुरतीच मर्यादित आहे. एखादी जागतिक कंपनी भारतात ‌‘फॅब‌’ उभारणार, त्यातून लाखो रोजगार निर्माण होणार, अशा बातम्या येतात. तथापि, सेमीकंडक्टर उद्योगाची रचना केवळ उत्पादनापुरतीच मर्यादित नाही.

एका आधुनिक चिपनिर्मितीमागे संशोधन, डिझाईन, बौद्धिकसंपदा, विशेष सॉफ्टवेअर, अत्याधुनिक उत्पादन उपकरणे, अतिशुद्ध रसायने, सिलिकॉन वेफर्स, चाचणी प्रयोगशाळा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि उच्च कौशल्यवान मनुष्यबळ अशा घटकांची साखळी असते. यांपैकी एखादा दुवा कमकुवत असेल, तर संपूर्ण उद्योगच मागे पडतो. म्हणूनच, आज जगातील सर्वांत मोठ्या चिप कंपन्यांपैकी अनेकांकडे अत्याधुनिक डिझाईन, पेटंट्स आणि संशोधनाची ताकद आहे. याच ज्ञानसंपदेवर त्यांनी जागतिक वर्चस्व निर्माण केले. सेमीकंडक्टर उद्योगात सर्वाधिक मूल्य कल्पना, संशोधन आणि बौद्धिकसंपदेतून निर्माण होते. अमेरिका-चीन तंत्रज्ञान संघर्षाने सेमीकंडक्टर उद्योगाचे महत्त्व अधोरेखित झाले. अमेरिकेने प्रगत चिप्स, उत्पादन उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञानावर चीनसाठी निर्बंध घातले. त्यानंतर चीनने स्वतःच्या सेमीकंडक्टर उद्योगासाठी, शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. यामुळे जागतिक कंपन्यांनाही एकाच देशावर अवलंबून राहण्याचा धोका जाणवला. ‌‘चायना प्लस वन‌’ धोरणाचा जन्म याच काळातला. भारताला या बदलाचा सर्वाधिक लाभ मिळू शकतो. जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ, स्थिर लोकशाही व्यवस्था, कुशल अभियंते, वाढती डिजिटल अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह राजकीय धोरण या भारताच्या जमेच्या बाजू.

या संपूर्ण चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारत आज जगातील सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रातील प्रमुख केंद्र आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची मोठी डिझाईन केंद्रे बंगळुरू, हैदराबाद, पुणे, नोएडा आणि चेन्नई येथे आहेत. मात्र, या डिझाईन्सवर भारतीय कंपन्यांची मालकी अत्यल्प आहे. हे ज्ञान भारतात निर्माण होते; पण त्याचे आर्थिक मूल्य विदेशी कंपन्यांकडे जाते. ही परिस्थिती बदलली नाही, तर भारत जागतिक प्रतिभा पुरवणारा देश राहील; पण जागतिक तंत्रज्ञान नेतृत्व करणार नाही. म्हणूनच, भारताने पुढील दशकात स्वतःच्या डिझाईन कंपन्या, बौद्धिकसंपदा, संशोधन संस्था आणि स्टार्टअप्ससाठी, आक्रमक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. भारतासाठी हा विषय सामरिक स्वातंत्र्याचाही आहे. संरक्षण क्षेत्रातील चिप्ससाठी, देशाला कायमच परदेशावर अवलंबून राहावे लागते. यामुळे, संकट काळात त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. संरक्षण, अंतराळ, दळणवळण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करायचा असेल, तर सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्णता अपरिहार्य ठरेल. त्यामुळे ‌‘आत्मनिर्भर भारत‌’ची खरी कसोटी याच क्षेत्रात लागणार आहे.

भारताने पहिल्या टप्प्यात जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात महत्त्वाचे यश मिळवले. आता दुसरा टप्पा अधिक अधिक निर्णायक आहे. सरकारी प्रोत्साहन देऊन ‌‘फॅब‌’ उभारणे शक्य आहे; पण जागतिक दर्जाची परिसंस्था निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन धोरण आणि संशोधनावर अब्जावधींची गुंतवणूक आवश्यक आहे. ‌‘आयआयटी‌’, ‌‘आयआयएससी‌’, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि खासगी उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करावे लागेल. याचबरोबर सेमीकंडक्टर उत्पादनासाठी लागणारी विशेष रसायने, सिलिकॉन वेफर्स, औद्योगिक गॅसेस, उत्पादन उपकरणे आणि चाचणी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत, भारतीय उद्योगांना सक्षम करणे तितकेच आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मानवी कौशल्य महत्त्वाचा घटक ठरणार आहे. जगातील प्रत्येक प्रगत चिपमागे हजारो प्रशिक्षित अभियंते, संशोधक आणि तंत्रज्ञ काम करतात. भारताकडे मोठ्या प्रमाणावर अभियंते आहेत. परंतु, सेमीकंडक्टर उत्पादनासाठीचे विशेष कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. पुढील दशकात लाखो कुशल व्यावसायिकांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण अधिक उद्योगाभिमुख करणे आवश्यक आहे. आज कौशल्यावर केलेली गुंतवणूकच उद्याच्या उद्योगाचे भविष्य ठरवेल. या संपूर्ण बदलात महाराष्ट्रालाही मोठी संधी आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, ऑटोमोबाईल, ‌‘आयटी‌’ आणि अभियांत्रिकी उद्योगांची पायाभूत रचना आधीपासून उपलब्ध आहे. त्याला सेमीकंडक्टर परिसंस्थेशी जोडल्यास, महाराष्ट्र देशातील सर्वांत मोठे नवोन्मेष केंद्र बनेल. विशेषतः पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, संशोधन संस्था आणि स्टार्टअप संस्कृतीचा योग्य वापर झाल्यास; महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या चिप संशोधन आणि डिझाईनचा केंद्रबिंदू होईल.

जागतिक परिस्थिती भारताच्या बाजूने आहे. भारताकडे मोठी बाजारपेठ, तरुण मनुष्यबळ, स्थिर लोकशाही व्यवस्था आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आहे. याचा योग्य उपयोग केला, तर पुढील दहा वर्षांत भारत जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातील निर्णायक शक्ती होईल. नव्या युगात भारताला तंत्रज्ञानाचा निर्माता, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे नेतृत्व म्हणून स्थान मिळवायचे असेल; तर संपूर्ण परिसंस्था हवी, हे लक्षात घ्यावे लागेल.





संजीव ओक

स्तंभलेखक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय तसेच भू-राजकीय घडामोडी, ऊर्जा या विषयाचे अभ्यासक
संबंधित मजकूर