मुंबई : (Devabhau Krushi Mauli Sohla) महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने क्रांतिकारी 'महिला शेतकरी अधिनियम' आणल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळा' या विशेष उपक्रमाचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत मंगळवार दि.२१ रोजी आ.चित्रा वाघ यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.
"या उपक्रमांतर्गत राज्यातील ७२ संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये ४ हजार शहरी महिलांना 'किचन गार्डन किट' व ४ हजार ग्रामीण महिलांना 'कृषी माऊली किट'चे मोफत वाटप केले जाणार आहे. या माध्यमातून शहरी भागातील महिलांना गृह-कृषीसाठी आणि ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिला शक्तीच्या कल्पकतेला आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा देणारा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात नवी सेंद्रिय व कृषी क्रांती घडवून आणेल." असा विश्वास आ. चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.(Devabhau Krushi Mauli Sohla)
" शहरी भागातील महिलांसाठी (गृह-कृषी व किचन गार्डन) तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करून मर्यादित जागेत (बाल्कनी, गच्ची) उत्तम प्रकारे भाजीपाला पिकवण्यासाठी नामांकित नर्सरी तज्ज्ञ, हायड्रोपोनिक्स कन्सल्टंट आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत आधुनिक गृह-कृषीचे सखोल मार्गदर्शन केले जाईल तर ग्रामीण भागातील महिलांना कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत मातीचा नमुना घेणे व सुपीकता ओळखण्याचे थेट प्रात्यक्षिक दिले जाईल." असे आ. चित्रा वाघ यांनी सांगितले.(Devabhau Krushi Mauli Sohla)
या भव्य सोहळ्यात सर्व महिला भगिनीं आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.(Devabhau Krushi Mauli Sohla)