श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठित

    20-Jul-2026   
Tuljabhavani Temple
 
मुंबई : (Tuljabhavani Temple) तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सोमवारी, महसुल विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
मागील पावसाळी अधिवेशनात विधानसभा नियम २९३ अन्वये सभागृहातील चर्चेवेळी विधानसभा सदस्यांनी तुळजाभवानी जमीन घोटाळ्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथील देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहार चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.(Tuljabhavani Temple)
 
समितीत कोण?
 
विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. तर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीत सदस्य असतील. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील सह आयुक्त महसूल हे या समितीत सदस्य सचिव असतील. पुढील एक महिन्यात या समितीने आपला चौकशी अहवाल शासनास सादर करायचा आहे.(Tuljabhavani Temple)
 
कोणत्या मुद्यांची तपास होणार?
 
हिंदु देवस्थान जमीन घोटाळा तुळजाभवानी मंदिरात ४१२० एकर जमीनीची निजामाकडून देण्यात आली. या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही असे असतानासुध्दा महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने खाजगी व्यक्तींना वाटप करण्यात आली. देवस्थानच्या नावे ३ हजार ३९७ एकर जमीन असताना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मात्र, काही खाजगी व्यक्तींच्या नावे वाटप करण्यात आली आहे. जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट सदर जमीन खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली. अव्वल कारकून यांनी अधिकाराचा गैरवापर करुन २६१ एकर जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे केली. अपसिंगा व उपळा येथील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करण्यात आल्या इत्यादी मुद्द्यांच्या आधारे ही समिती चौकशी करणार असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले.(Tuljabhavani Temple)
 
तत्पूर्वी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनाम जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर महसुलमंत्र्यांनी धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दि. ७ जुलै रोजी दै. मुंबई तरूण भारतने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.(Tuljabhavani Temple)
 
समितीने निष्पक्ष चौकशी करावी - सुनील घनवट
 
"महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटल्यानंतर त्यांनी तुळजापूरच्या जमीन प्रकरणात शेरा मारून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक तीन सदस्यीय समिती नेमली असून चौकशी सुरू झाली आहे. आमच्या देवस्थानाकडे ही जमीन नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण ज्यावेळी निजामांनी ही जमिनी दिली तेव्हाच यात काहीतरी गडबड झालीये का? या जमिनी मठांच्या नावावर दिल्या असे त्यांचे म्हणणे आहे. या जमिनी कसून त्याची वहिवाट करून त्यातील काही टक्के उत्पन्न देवस्थानाला द्यायचे, हे त्यामागचे उद्दिष्ट होते. पण आज किती मठांकडून देवस्थानांना उत्पन्न येते? याची चौकशी व्हावी. या समितीने निष्पक्षपणे चौकशी करून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे."
 
- सुनील घनवट राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर