माळढोकच्या बदलत्या अधिवासाचे संकेत

    20-Jul-2026   
 
 
Great Indian Bustard in Sahyadri
 
कोल्हापूरच्या सह्याद्रीत माळढोक आणि रत्नागिरीत तणमोर या गवताळ अधिवासाशी निगडित दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदींनी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. सह्याद्री हा या पक्ष्यांचा पारंपरिक अधिवास नसताना, त्यांचे येथे दर्शन होणे, ही केवळ अपवादात्मक घटना नसून बदलते अधिवास, हवामानबदल आणि गवताळ परिसंस्थेच्या र्‍हासाशी संबंधित महत्त्वाचा पर्यावरणीय संकेत मानला जात आहे. या नोंदींनिमित्ताने सह्याद्रीतील संभाव्य अधिवास, महाराष्ट्रातील संशोधन आणि संवर्धनाच्या नव्या दिशेचा वेध घेणारा हा लेख...
 
कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी जलाशय परिसरातील सह्याद्रीच्या अधिवासात नुकतीच माळढोक (Great Indian Bustard – Ardeotis nigriceps) या अत्यंत दुर्मीळ पक्ष्याची नोंद झाली. त्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात तणमोर (Lesser Florican – Sypheotides indicus) या गवताळ परिसंस्थेतील पक्ष्याचे प्रथमच दर्शन घडले होते. सह्याद्री हा प्रामुख्याने सदाहरित व निमसदाहरित वनांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, तर माळढोक आणि तणमोर हे गवताळ प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत. त्यामुळे या दोन्ही नोंदींनी पक्षीतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि वन्यजीव संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. माळढोक हा भारतातील सर्वाधिक संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक असून ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटने’ने (IUCN) त्याला ‘नष्टप्राय’ श्रेणीत (Critically Endangered) स्थान दिले आहे. एके काळी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य भारतातील विस्तीर्ण गवताळ प्रदेशांत आढळणारा हा पक्षी आज अत्यल्प संख्येत उरला आहे. त्याचप्रमाणे, तणमोरालाही ‘संकटग्रस्त’ (Endangered) श्रेणीत समाविष्ट करण्यात आले असून त्याची संख्या सातत्याने घटत आहे. गवताळ परिसंस्थांचा र्‍हास, शेतीतील बदल, विद्युतवाहिन्यांशी होणारी धडक, अनियंत्रित विकासकामे आणि हवामानबदल ही या दोन्ही पक्ष्यांसमोरील प्रमुख आव्हाने मानली जातात. सह्याद्रीत हे पक्षी का दिसत आहेत, या प्रश्नाचे निश्चित उत्तर अद्याप उपलब्ध नसले, तरी उपलब्ध संशोधनातून काही महत्त्वाच्या शक्यता समोर येतात. अधिवासाचे तुकडीकरण - महाराष्ट्रातील नैसर्गिक गवताळ प्रदेश गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. ऊसशेतीचा विस्तार, सिंचन प्रकल्प, औद्योगिक विकास, वृक्षलागवड आणि नागरीकरणामुळे पारंपरिक माळराने नाहीशी होत आहेत. परिणामी, या पक्ष्यांना पर्यायी अधिवास शोधावे लागत आहेत. सह्याद्रीतील काही पठारे, मोकळी कुरणे, डोंगरमाथे आणि जलाशयांलगतची गवताळ क्षेत्रे त्यांना तात्पुरता आसरा देत असावीत.
 
भ्रमणशील हालचाली - माळढोक पूर्णपणे एका ठिकाणी राहणारा पक्षी नाही. ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्ल्यूआयआय) आणि ‘महाराष्ट्र वनविभागा’च्या सहकार्याने करण्यात आलेल्या उपग्रहआधारित अभ्यासात काही पक्षी प्रजनन क्षेत्राबाहेर शेकडो किमीपर्यंत भ्रमण करतात, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरातील नोंद ही कायमस्वरूपी अधिवासाची नव्हे, तर भ्रमणशील हालचालींची असण्याची शक्यता अधिक आहे.
 
हवामानबदलाचा परिणाम - भारतीय उपखंडात पर्जन्यमान, तापमान आणि गवत वाढण्याच्या कालावधीत बदल होत असल्याचे अनेक अभ्यासांनी दाखवून दिले आहे. अन्नाची उपलब्धता, सुरक्षित विश्रांतीची ठिकाणे आणि प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती यांनुसार पक्ष्यांच्या हालचाली बदलू शकतात. सह्याद्रीतील नव्या नोंदी या हवामानबदलाच्या परिणामांशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
सह्याद्रीतील गवताळ पठारे - सह्याद्री म्हणजे केवळ दाट जंगल नव्हे. कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील अनेक लेटराईट पठारे, डोंगरमाथे आणि मोकळी गवताळ कुरणेही स्वतंत्र परिसंस्था आहेत. अशा अधिवासात कीटक, बिया आणि इतर खाद्य उपलब्ध असल्यामुळे हे पक्षी काही काळ थांबत असावेत.
 
कोल्हापूरातील माळढोक आणि रत्नागिरीतील तणमोराची नोंद या केवळ दुर्मीळ घटना नाहीत; त्या बदलत्या पर्यावरणीय वास्तवाचे संकेत आहेत. गवताळ अधिवासांचा र्‍हास, हवामानबदल आणि लॅण्डस्केपमधील बदल यांमुळे हे पक्षी नवीन प्रदेशांचा वापर करत असावेत. या नोंदींचा उपयोग सह्याद्री आणि दख्खनच्या गवताळ परिसंस्थांमधील पर्यावरणीय संबंध समजून घेण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील संशोधन, दीर्घकालीन निरीक्षणे आणि गवताळ परिसंस्थांचे वैज्ञानिक व्यवस्थापन यांना प्राधान्य देणे, ही काळाची गरज आहे. माळढोक आणि तणमोराचे सह्याद्रीतील दर्शन हे निसर्गाने दिलेले एक महत्त्वपूर्ण संकेत आहेत; त्या संकेतांचे वैज्ञानिक आकलन आणि संवर्धनात्मक कृती यांवरच या दुर्मीळ पक्ष्यांचे भविष्य अवलंबून आहे.
 
महाराष्ट्रातील संशोधन
 
महाराष्ट्रात माळढोकावर सर्वाधिक संशोधन सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्यात झाले आहे. १९७९ मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्यात ‘महाराष्ट्र वनविभाग’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्ल्यूआयआय) यांनी लोकसंख्या, प्रजनन, अधिवास व्यवस्थापन आणि संवर्धन यांवर सातत्याने अभ्यास केला आहे. डॉ. असद रहमानी यांच्या The Great Indian Bustard या ग्रंथाने या पक्ष्यांच्या जीवशास्त्राचा पाया घातला. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'Not All Those Who Wander Are Lost' या संशोधनात महाराष्ट्रातील माळढोकाच्या हालचालींचे उपग्रहआधारित विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात पक्षी संरक्षित क्षेत्राबाहेरील गवताळ प्रदेश, शेती आणि खुल्या अधिवासांचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संवर्धन केवळ अभयारण्यापुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण भूभागाच्या पातळीवर करणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. २०२६ मध्ये 'Indian BIRDS' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या पत्रव्यवहारात कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी जलाशय परिसरात मादी माळढोकाची नोंद करण्यात आली. संशोधकांनी अशा नोंदींना विखुरलेल्या हालचालींचा भाग मानत, सह्याद्रीतील खुल्या अधिवासांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तणमोरावरही गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. रत्नागिरीतील २०२५ मधील नोंद ही कोकणातील पहिल्या विश्वसनीय नोंदींपैकी एक मानली जात आहे. निरीक्षणादरम्यान हा पक्षी लेटराईट पठारावरील छोट्या जलसाठ्यांजवळ खाद्य शोधताना दिसल्याची माहिती नोंदविण्यात आली आहे. यावरून स्थलांतर किंवा भ्रमणादरम्यान अशा अधिवासांचा तात्पुरता वापर होत असल्याचे सूचित होते.

संवर्धनाची दिशा
 
माळढोक आणि तणामोर यांच्या संरक्षणासाठी केवळ अभयारण्ये पुरेशी ठरणार नाहीत. गवताळ परिसंस्था स्वतंत्र जैवविविधता क्षेत्र म्हणून मान्य करून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विद्युतवाहिन्या भूमिगत करणे किंवा त्यांना पक्षी-दृश्यमान उपकरणे बसविणे, अनियंत्रित वृक्षलागवड टाळणे, नैसर्गिक माळराने जतन करणे आणि स्थानिक समुदायांचा सहभाग वाढविणे, या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. नागरिक विज्ञान (Citizen Science) हाही संवर्धनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. (eBird) सारख्या व्यासपीठांवर पक्षीप्रेमी नोंदवत असलेल्या निरीक्षणांमुळे दुर्मीळ पक्ष्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य होत आहे. मात्र, अशा प्रत्येक नोंदीची तज्ज्ञांकडून शास्त्रीय पडताळणी होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
 
सह्याद्रीतील पोषक अधिवास
 
सह्याद्री हा तणमोर (Sypheotides indicus) आणि माळढोक (Ardeotis nigriceps) यांचा पारंपरिक अधिवास नसला, तरी येथील काही गवताळ पठारे, डोंगरमाथ्यांवरील माळराने आणि जलाशयालगतची खुली कुरणे, या पक्ष्यांच्या भ्रमणादरम्यान (Dispersal) तात्पुरता अधिवास ठरू शकतात. अलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी जलाशय परिसरात माळढोक, तर रत्नागिरीतील लेटराईट (जांभा) पठारावर तणामोराची नोंद झाल्याने या अधिवासांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधकांच्या मते, कोल्हापूरमधील तुळशीराधानगरी परिसर, चंदोली व्याघ्र प्रकल्पालगतची माळराने, विशाळगड-गगनबावडा पठार, सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील गवताळ भाग, तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील जांभा पठारे ही क्षेत्रे या पक्ष्यांसाठी संभाव्य अधिवास ठरू शकतात. या भागांत मध्यम उंचीचे गवत, विपुल कीटक, मोकळी जागा आणि तुलनेने कमी मानवी हस्तक्षेप असल्याने पक्ष्यांना खाद्य आणि तात्पुरता निवारा मिळण्याची शक्यता असते. ही ठिकाणे या पक्ष्यांचा कायमस्वरूपी अधिवास असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. उपलब्ध नोंदींवरून ही क्षेत्रे भ्रमण किंवा अल्पकालीन मुक्कामासाठी वापरली जात असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे या परिसरात दीर्घकालीन पक्षी सर्वेक्षण, उपग्रहआधारित हालचालींचा अभ्यास आणि गवताळ परिसंस्थेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अशा संशोधनातून सह्याद्री आणि दख्खनच्या गवताळ प्रदेशांमधील पर्यावरणीय संबंध अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर