
महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथील नियोजन भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणावर कठोर भूमिका मांडली. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.(Chandrashekhar Bawankule)
लेटरहेडचा वापर अवैध व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी होऊ नये.
भाजप पक्षाच्या लेटरपॅडच्या गैरवापराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाच्या लेटरहेडचा वापर कोणत्याही अवैध व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी होऊ नये. ट्रक माफिया, सट्टा, गोहत्या, अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देण्यासाठी लेटरपॅडचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल. पदाधिकाऱ्यांनी लेटरहेडचा वापर समाजहित आणि जनसेवेसाठीच करावा, असे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
दिल्ली आंदोलन प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले राजकीय षड्यंत्र
नीट परीक्षा प्रकरणावरून सरकार विरोधात सुरू असलेले आंदोलन हे ठोस मुद्द्यांवर आधारित नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले राजकीय षड्यंत्र आहे.(Chandrashekhar Bawankule)
बावनकुळे म्हणाले की, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे काही युवक मनस्तापातून आंदोलनात सहभागी झाले असतील, मात्र याचा अर्थ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा होत नाही. पेपरफुटी प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर नीट परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
आमच्या कोणत्या मंत्र्याने पेपर लीक केला होता का? एखाद्या व्यक्तीने गैरप्रकार केला असेल तर त्याची शिक्षा त्यालाच झाली पाहिजे. सरकारने दोषींवर कारवाई केली आहे. सुधारणा सुचविणे योग्य आहे; मात्र मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून राजकारण करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यास ठोस मुद्दे नसल्यामुळे युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अध्यक्षाचा राजीनामा मागणे योग्य नाही
संघ परिवाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करताना त्यांनी मंदिरांमधील चोरीच्या घटनांचाही उल्लेख केला. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली होती, तेव्हा अध्यक्ष उद्धव ठाकरे होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. मंदिरातील एखाद्या कर्मचाऱ्याने चोरी केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; अध्यक्षाचा राजीनामा मागणे योग्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.(Chandrashekhar Bawankule)
अयोध्येतील राम मंदिरातील गैरप्रकाराच्या संदर्भातही संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीसाठी संपूर्ण व्यवस्थेला किंवा अध्यक्षाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे नीट पेपरफुटीप्रकरणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणेही योग्य नाही.
एकही दिव्यांग ट्रायसायकलपासून वंचित राहणार नाही
दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या ट्रायसायकल योजनेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची विशेष ट्रायसायकल तयार करण्यात आली आहे. झोमॅटोसोबत समन्वय साधून दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अनेक दिव्यांग व्यक्ती दररोज सुमारे ८०० रुपये कमावत आहेत. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग ट्रायसायकलपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असून इच्छुकांनी महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेमार्फत अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले.(Chandrashekhar Bawankule)
मागण्या असतील तर चर्चा करण्यास तयार
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नव्या पक्ष स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, पक्ष स्थापन करणे हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा देतानाच राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी विविध महामंडळे, योजना आणि कल्याणकारी उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यासाठी १,४०० कोटी रुपयांचा निधी
पावसाची परिस्थिती आणि पेरणीबाबत बोलताना त्यांनी काही भागात पाणी उपलब्ध असले तरी विजेची कमतरता असल्याचे सांगितले. धानाची रोपे वाचविण्यासाठी अतिरिक्त वीजपुरवठा, जलसंधारणाचे नियोजन आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यासाठी १,४०० कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. या निधीतून आदिवासी, मागासवर्गीय आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध योजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
जनसंवाद हा महत्त्वाचा उपक्रम
जनता संवादबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, जनतेशी सातत्याने संवाद साधल्याशिवाय शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविता येत नाहीत. नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी जनसंवाद हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
उद्धव ठाकरे यांचे आंदोलन केवळ राजकीय नौटंकी
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुरू असलेले आंदोलन हे केवळ राजकीय नौटंकी असल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असूनही मतांवर परिणाम होईल या भीतीने ते अयोध्येला गेले नाहीत. आता अशा आंदोलनांमधून काहीही साध्य होणार नाही. या आंदोलनात तेच ते लोक दिसतात; सामान्य जनतेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जनतेला केवळ विकास हवा आहे.
पूर्वी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत त्यांनी सांगितले की, काही निधी सूर्यघर योजनेसह विविध लोककल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पूर्वी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णयही घेतले जातील.(Chandrashekhar Bawankule)
जमिनीच्या वापरासाठी झोन बदलण्याची प्रक्रिया लागू
एन.ए. (नॉन-अॅग्रिकल्चरल) कायद्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात पूर्वीची एन.ए. प्रक्रिया रद्द झाली असून आता जमिनीच्या वापरासाठी झोन बदलण्याची प्रक्रिया लागू राहील. कृषी क्षेत्राचे निवासी किंवा अन्य वापरात रूपांतर करण्यासाठी संबंधित झोनमध्ये बदल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)