भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला ४५ कोटी रुपयांचा निधी - मंत्री ॲड. आशिष शेलार

भारतातील पहिले एआय अधारित पर्यटन केंद्र

    20-Jul-2026   

AI Based Tourism Centre

 

मुंबई : (AI Based Tourism Centre) मुंबई उपनगराच्या भांडूप येथील महत्त्वाकांक्षी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. (AI Based Tourism Centre)

आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून, भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे २०.०९ हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी केवळ ०.३५ हेक्टर क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या परिसरात कांदळवन परिसंस्था, दलदलीचे अधिवास, खारफुटी क्षेत्रे तसेच स्थानिक व स्थलांतरित सुमारे २५० विविध जातीच्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. (AI Based Tourism Centre)

प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?

 

प्रकल्पामध्ये पक्षीनिरीक्षण केंद्रे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा, हरित क्षेत्र विकास, नैसर्गिक अधिवास संवर्धन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास, जैवविविधतेला चालना मिळण्यास, पर्यटन विकासास गती मिळण्यास तसेच स्थानिक नागरिकांसाठी विरंगुळा व पर्यावरण शिक्षणाचे प्रभावी केंद्र उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. (AI Based Tourism Centre)

 

या प्रकल्पामध्ये २.१६ किलोमीटर लांबीचा मॅग्रोव्ह नेचर ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्रे, व्ह्यूइंग डेक्स, बहुमजली वॉच टॉवर्स, बटरफ्लाय गार्डन, जेट्टी, नेचर इंटरप्रिटेशन सेंटर व व्याख्यानगृह, बाह्य पार्किंग सुविधा तसेच इतर पर्यावरणपूरक पर्यटन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नियोजन परिसंस्थेला कमीत कमी बाधा पोहोचेल, अशा पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असेल. (AI Based Tourism Centre)

भारतातील पहिले एआय अधारित पर्यटन केंद्र

 

भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पक्षी शोध व निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सुमारे १.५ किलोमीटर परिसरात रिअल-टाईम पक्षी निरीक्षण, एआय आधारित पक्षी ओळख प्रणाली, स्वयंचलित ट्रॅकिंग, इव्हेंट ॲनालिटिक्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक आणि जैवविविधता दस्तऐवजीकरण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.(AI Based Tourism Centre)

 

तसेच डिजिटल लेन्स इंटिग्रेशन, केंद्रीकृत डेटा व्यवस्थापन, लाईव्ह सिंक्रोनायझेशन आणि परस्परसंवादी डिजिटल प्रणालीमुळे देश-विदेशातील पर्यटक, संशोधक, पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठरणार आहे. (AI Based Tourism Centre)

 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर