बालपण टिपणाऱ्या हातांना कृतज्ञतेची शाल

डोंबिवलीत जुन्या आठवणींचा भावुक कोलाज

    20-Jul-2026


manoj mehta
 
 
 
डोंबिवली : एका जुन्या फोन कॉलने तीस वर्षाचा काळ एका क्षणात पुसून टाकला आणि कॅमेऱ्यामागचा एक निस्सीम कलाकार भावुक झाला. ग्रीन्स इंग्लीश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जेव्हा ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता यांना फोन करून तुम्ही आमचे बालपण टिपलेत. आता सत्कार स्वीकारायला यावंच लागेल असा हट्ट धरला, तेव्हा जुन्या आठवणींचा जणू फ्लॅश बॅकच सुरू झाला. फोटोग्राफर मेहता यांचा सत्कार सोहळा डोंबिवलीत कृतज्ञतेचा नवा वस्तुपाठ ठरला आहे.

ग्रीन्स इंग्लीश स्कूलचे 1995-96 या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मेहता यांच्याशी संपर्क केला. ‘तुम्ही आमचे ज्युनियर पासून ते दहावीपर्यतचे सर्व फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. म्हणूनच आमच्या पहिल्या-वहिल्या भेटीगाठी संमेलनात तुमचा सत्कार करणार आहोत’ असे त्या विद्यार्थ्यांनी मेहता यांना सांगितले. माजी विद्यार्थ्यांचे हे बोल ऐकूनच मेहता यांच्या डोळ्य़ातून आनंदाश्रु वाहू लागले. शालेय जीवनात आम्हाला ज्यांची साथ लाभली ते आमचे शिक्षक, शिपाई यांचा आम्ही सत्कार करणार आहोतच. पण आम्हाला आमचे बालपण टिपणाऱ्या मेहता काकांचा ही सत्कार करायचा आहे असे त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या विनंतीचा मान राखून सत्कारसोहळ्य़ाला गेलेल्या मेहता यांचे नाव पुकारताच त्यांना एखादा ऑस्कर मिळाल्यासारखा वाटत आहे. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक, शिपाई आणि मेहता यांना व्यासपीठावर बोलावल्यावर सगळ्य़ा विद्यार्थ्यांनी एकदम उभं राहून, टाळ्य़ा वाजवून मानवंदना दिली. अशा प्रकारचा अनपेक्षित सन्मान मेहता यांच्या आठवणीना उजाळा देऊन गेला. या माजी विद्यार्थ्यांमध्ये महेश शुक्ला, यज्ञेश मुर्डेश्वर, प्रसन्न सहस्त्रबुध्दे, डिंपल धिंग्रा, तेजस ठक्कर, ज्युली सॉलोमन यांचा समावेश होता.
 
 
---------------------------------------------------------




संबंधित मजकूर