मुंबई : (Ashish Shelar) राम भक्तांच्या भावनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना बरं वाटावं म्हणून उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत का? यातून काही विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी ते लांगूलचालनाचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना यात गुंतवून ठेवत एसआयआरमध्ये विशिष्ट वर्गाला त्यांच्या नोंदणीची मुभा देणे आणि हिंदूंना त्यांच्या नोंदणीपासून भरकटवण्याचा डाव आहे का? असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे केलेल्या रामरक्षा आंदोलनावर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. आंदोलनावर रोख लावण्यासाठी आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही. हनुमान चालिसा म्हणण्यास बंदी घालणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राने पाहिले आहे आणि दुसरीकडे, रामरक्षेच्या आंदोलनाला कुठलीही वैधानिक रोख न घालणारे देवेंद्र फडणवीस सरकारही आपण पाहतो आहोत. मात्र, हनुमान चालिसावर रोख लावणारे आज रामरक्षा पठण करू पाहत आहेत, ही गमतीची बाब आहे."(Ashish Shelar)
ते पुढे म्हणाले की, "आंदोलनकर्त्यांची मागणी काय आणि त्यांची मानसिकता काय? राम मंदिरातील तिजोरीत झालेल्या अपहार या विषयावर त्यांचे आंदोलन असल्यास या विषयावर क्रोध, शोक आणि राग हिंदू जनता आणि सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याविरोधात गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे. उत्तर प्रदेश सरकारने या अपहारात ज्यांचा ज्यांचा हात आहे त्याच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. राम मंदिर तिजोरीतील अपहारातील प्रथमदर्शनी आरोपींना अटकही झाली आहे. तसेच न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामा दिला आहे. परमेश्वराची माफी मागून शुद्धीकरिता राम मंदिरात धार्मिक अभियान सुरु झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने यात कुणालाही पाठीशी घातलेले नाही."(Ashish Shelar)
ठाकरेंनी अयोध्येला जाऊन नाक घासावे
"हिंदू जागृती आणि राम मंदिरातील अपहार या मुद्द्यावर आंदोलक आंदोलन करणार असल्यास त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. यात राजकीय अभिनिवेष आहे का, ते बघितले पाहिजे. उबाठा गटाला रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्याआधी समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर नाक घासावे लागेल. ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला त्यातल्या पापी समाजवादी पक्षासोबत उद्धव ठाकरे तुम्ही राहिला आहात. त्यामुळे हिंदू जागृतीवर बोलण्याआधी तुम्हाला माफी मागावी लागेल. प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व अमान्य करणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही आहात. त्यामुळे काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी असे ठाकरे त्यांना म्हणणार का? हे आंदोलन तोंडदेखलेपणाचे आहे. हे आंदोलन रामभक्तांची व्यथा मांडणारे नसून यात काही राजकीय कथा मिळते हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. या आंदोलनामागे षडयंत्र आहे," असा आरोपही मंत्री आशिष शेलार यांनी केला.(Ashish Shelar)
उबाठा गट आणि मनसे एकत्र येण्याच्या विषयावर म्हणाले की, “हा त्यांचा व्यक्तिगत आणि पारिवारिक विषय आहे. मात्र, विषय रामाचा असल्याने मी एवढेच म्हणेन एका बाजूला उद्धव रामनाम आणि रामरक्षा पठण करताहेत. पण प्रभू रामचंद्रांनी सत्तात्याग करून स्वतःच्या भावाला सत्ता दिली होती. या ठिकाणी दोन भावांचा संदर्भ घ्यायचा झाला तर प्रभू रामचंद्राचा आदर्श बाळगून पक्षांतर्गत सत्तेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलेली वर्तणूक मी सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतः वनवास घेऊन राज्य करण्यासाठी भावाला विनंती करणे या भावना समजून घ्याव्या लागतील. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या संघटनेचे प्रमुखपद मिळवण्यासाठी काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे आणि त्यामुळे त्यांना रामभक्ती, रामराज्य आणि राम मंदिर यावर बोलण्याचा अधिकार आहे का?"
संजय राऊत बालिश
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “संजय राऊत बालिश आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार, काम करण्यात आले आहे. पोलीस कारवाई संविधानिक आहे. त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत."
मविआत एकमत नाही
"संजय राऊत रामरक्षा आंदोलनासाठी सरसंघचालत मोहन भागवतजी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमंत्रण देतात. पण दुसरीकडे, काँग्रेसचे नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांना ते बोलवत नाहीत. त्यांना बोलवले असेल तरी ते आंदोलनात जात नाहीत. याचा अर्थ रामरक्षा आंदोलनाला काँग्रेसचाच विरोध असून मविआत एकमत नाही," अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली. (Ashish Shelar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....