मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील अत्यंत संकटग्रस्त पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळढोक या पक्ष्याची कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी जलाशय परिसरात नोंद करण्यात आली आहे (great indian bustard kolhapur). विशेष म्हणजे हा परिसर माळढोकसाठी राज्यात राखीव करुन ठेवलेल्या अधिवासापासून सुमारे २९० किलोमीटर अंतरावर, म्हणजेच पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भू-भागामध्ये आहे (great indian bustard kolhapur). त्यामुळे ही नोंद केवळ दुर्मीळ निरीक्षण नसून महाराष्ट्रातील माळढोकाच्या हालचाली, अधिवास निवड आणि संवर्धन धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे (great indian bustard kolhapur). ही नोंद पक्षितज्ज्ञांसाठी मोठी आणि आशादायी घटना ठरली आहे. (great indian bustard kolhapur)
इंडियन बर्डस् या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात कोल्हापूरमधील तुळशी जलाशय परिसरातून माळढोक पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. विवेकानंद महाविद्यालयाचे राहुल कांबळे, गजानन सोनटक्के आणि सागर व्हनाळकर यांनी या निरीक्षणाची नोंद केली आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील तुळशी जलाशयाच्या काठावर एक प्रौढ मादी माळढोक अन्न शोधताना त्यांना दिसली. ती सुमारे मिनिटभर उघड्या गवताळ परिसरात संथपणे फिरत होती. निरीक्षकांपासून सुरक्षित अंतर राखत ती सतत सावध होती. काही वेळाने पश्चिमेकडे उडून गेल्यानंतर ती पुन्हा दिसून आली नाही. त्यानंतर अनेक वेळा परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र दुसरा माळढोक अथवा त्याच पक्ष्याचे पुनर्दर्शन झाले नाही.
तुळशी जलाशय सुमारे १३५ हेक्टर क्षेत्रफळाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या परिसरात उघडी गवताळ जमीन, पडीत शेती, जलाशयाच्या हंगामी उघड्या होणाऱ्या कडा आणि विरळ झुडपे आढळतात. दाट जंगलाऐवजी मोकळे गवताळ क्षेत्र असल्यामुळे माळढोकासारख्या मोठ्या पक्ष्याला अन्न शोधण्यासाठी आणि दूरवर नजर ठेवण्यासाठी हा परिसर अनुकूल ठरू शकतो. संशोधकांनी एक महत्त्वाची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत सोलापूर परिसरात एक एकटी मादी माळढोक सातत्याने नोंदवली गेली होती. त्यानंतर ती दिसेनाशी झाली. तुळशी जलाशयात दिसलेला माळढोक ही तीच मादी असू शकते, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्या पक्ष्याला सॅटेलाईट टॅग न बसविण्यात आल्यामुळे याची खात्री देता येत नाही.
संवर्धनाच्या विस्ताराची गरज
एकेकाळी महाराष्ट्रातील अहमदनगर, नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील गवताळ प्रदेशात माळढोक मोठ्या प्रमाणावर आढळत होता. मात्र, आज महाराष्ट्रात मुख्यत्वे सोलापूर–अहमदनगर परिसरातील नान्नज व आसपासची गवताळ क्षेत्र हा या पक्ष्याचा प्रमुख आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. या संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे माळढोकाचे संवर्धन केवळ अभयारण्यांपुरते मर्यादित ठेवून चालणार नाही. गवताळ प्रदेश, पडीत शेती, जलाशय परिसर आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील मोकळे अधिवास यांनाही संवर्धन नियोजनात समान महत्त्व द्यावे लागेल. पश्चिम घाटातील तुळशी जलाशयातील ही नोंद दर्शविते की योग्य अधिवास उपलब्ध असल्यास माळढोक अशा नव्या भागांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे राज्यात 'लँडस्केप-स्तरीय संवर्धन' (Landscape-level Conservation) राबविण्याची गरज संशोधकांनी अधोरेखित केली आहे.