जागतिक शार्क जनजागृती दिन विशेष : सह्याद्रीची गुलाबी

    13-Jul-2026   
 
World Shark Awareness Day
 
जंगलात वाघ जसा सर्वोच्च भक्षक आहे, तशीच भूमिका समुद्रात शार्क बजावतात. शार्क नाहीसे झाले, तर अनेक मध्यम आकाराच्या माशांची संख्या अनियंत्रित वाढते आणि त्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होतो. शार्कबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि शार्कबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दि. १४ जुलै या दिवशी ‘शार्क जागृकता दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे निमित्त साधून महाराष्ट्रातील शार्क संवर्धन आणि संरक्षणाचा घेतलेला आढावा...

शार्क म्हणजे काय?
 
शार्क हा एक विशेष प्रकारचा मासा आहे. कारण त्यांचे शरीर इतर माशांप्रमाणे हाडांऐवजी कार्टिलेजपासून बनलेले असते. ज्याला ‘इलास्मोब्रान्च’ म्हणून ओळखले जाते, यामध्ये वाघळी (स्टिंग रे), सॉफिश आणि स्केट्स या प्रजातीही समाविष्ट आहेत. हाडांपेक्षा खूपच हलका सांगाडा आणि कमी घनतेचे तेल भरलेले मोठे यकृत हे दोन्ही शार्कला तरंगायला मदत करतात. शार्क हे डायनासोरपेक्षाही प्राचीन (४२५ ते ४५५ दशलक्ष वर्षे) जीवंत प्रजातींपैकी एक आहेत. जगात शार्कच्या सुमारे ५०० प्रजाती आहेत. त्यातील, भारतात ८० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. शार्क वेगवेगळ्या आकार आणि रंगात येतात. उदाहरणार्थ, सर्वांत लहान द्वार्फ लांटर्न शार्क (जो हाताच्या आकाराचा असतो) पासून सर्वांत मोठे व्हेल शार्क, जो १२ मीटरपर्यंत लांब असू शकतो. माणसाच्या बोटांच्या ठशाप्रमाणे, व्हेल शार्कवर असलेल्या ठिपक्यांच्या आकारावरून वैयक्तिक शार्क ओळखता येतात. तसेच, गोब्लिन शार्क चमकदार गुलाबी रंगाचे असतात आणि हॅमरहेड शार्कच्या डोक्याला हातोड्याचा आकार असतो. ‘हॅमरहेड’ ही महाराष्ट्रात आढळणारी सामान्य प्रजाती आहे. शार्कची त्वचा लहान दातांसारख्या रचनांनी बनलेली असते, ज्याला ‘डर्मल डेंटिकल्स’ म्हणतात. हे ‘डर्मल डेंटिकल्स’ शेपटीच्या दिशेने झुकलेले असतात आणि जेव्हा शार्क पोहतो, तेव्हा पाण्यातील घर्षण कमी करण्यास मदत करतात. शिकार शोधण्यासाठी आणि महासागरात नॅव्हिगेट करण्यासाठी शार्क इलेक्ट्रो-सेन्सर्सचा वापर करतात. शार्क सात हजार फूट ते दहा हजार फूट (२ हजार, १३३ ते ३ हजार, ४८ मीटर) खोल पाण्यात राहतात व जगातील सर्व महासागरांमध्ये आढळतात.

महाराष्ट्रातील शार्क
 
शार्क (मुशी), पाकट (स्टिंग रे), गिटार फिश (लांजा) या मत्स्यप्रजातींचा समावेश ‘इलास्मोब्रान्च’ या कुळात होतो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययुसीएन) मुशी आणि पाकटच्या साधारण ३६ टक्के प्रजाती या लुप्त होण्याचा मार्गावर असल्याचे म्हटले आहे. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’च्या ७६ प्रजाती आता ‘अति-संकटग्रस्त’, ११२ प्रजाती ‘संकटग्रस्त’ आणि १६७ प्रजाती ‘धोकाग्रस्त’ पातळीवर नोंदविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लहान किनारी शार्कपासून ते जगातील सर्वांत मोठा मासा असलेल्या व्हेल शार्कपर्यंत अनेक प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मोरी-मुशी या स्थानिक नावांनी शार्क ओळखले जातात. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात शार्कच्या एकूण १६ प्रजाती आढळतात. यामध्ये स्पेडनोज शार्क, टायगर शार्क, ग्रे शार्पनोज शार्क, मिल्क शार्क, ब्लॅकटीप शार्क, स्पॉट-टेल शार्क, बूल शार्क, ग्रेसफूल शार्क, ब्रॉर्डफिन शार्क, हार्डनोज शार्क, ग्रे बांबू शार्क, रिज्ड्-बॅक शार्क, ग्रेट हॅमरहेड शार्क, स्कॉलप्ड-हॅमरहेड शार्क, पेलाजिक थ्रेशर शार्क आणि व्हेल शार्क यांचा समावेश आहे. यामधील ब्रॉडफिन शार्क, पेलाजिक थ्रेशर शार्क आणि व्हेल शार्क या संकटग्रस्त प्रजाती असून ग्रेट हॅमरहेड शार्क आणि स्कॉलप्ड-हॅमरहेड शार्क या नष्टप्राय प्रजाती आहेत. स्पेडनोज शार्क हा महाराष्ट्रात सर्वाधिक पकडला जाणारा शार्क आहे. कोकण किनार्‍यावर हा पारंपरिक खाद्य मासा असून स्थानिक बाजारात ‘मोरी’ या नावाने विकला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावर त्याचे प्रमाण विशेषतः जास्त असल्याची नोंद आहे.
 
पिल्लांची मासेमारी घातक
 
गेल्या काही दशकांत शार्कच्या मांसाला आणि विशेषतः त्यांच्या परांना (Shark Fins) वाढलेली मागणी, अतिमासेमारी आणि पिल्लांची मोठ्या प्रमाणावर होणारी शिकार यांमुळे अनेक शार्क प्रजातींची संख्या झपाट्याने घटली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही ही समस्या गंभीर होत चालली होती. शार्क इतर बहुतांश माशांपेक्षा वेगळे असतात. ते हजारो अंडी घालत नाहीत. अनेक प्रजाती थेट जिवंत पिल्लांना जन्म देतात. एका वेळेस केवळ काहीच पिल्ले जन्माला येतात. अनेक शार्कना लैंगिक प्रौढत्व प्राप्त होण्यासाठी तीन ते दहा वर्षे लागतात. म्हणूनच पिल्ले पकडली गेली, तर ती आयुष्यात एकदाही प्रजनन करू शकत नाहीत. परिणामी, पुढील पिढी निर्माण होत नाही आणि काही वर्षांत संपूर्ण मत्स्यसाठा कोसळू शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाने शार्क आणि रे (Rays) यांच्या संवर्धनासाठी ‘मिनिमम लीगल साईज’ (Minimum Legal Size – MLS) या महत्त्वपूर्ण नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हा निर्णय समुद्री संवर्धनाच्या दृष्टीने राज्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 
सुटका केल्यास फायदाच
 
मालवण किनारपट्टीवरील आमच्या अभ्यासात मासळी उतरविण्याच्या ठिकाणी (Fish Landings) शार्क आणि रे यांच्या ३५ प्रजातींची नोंद करण्यात आली. यांपैकी जवळपास निम्म्या प्रजाती IUCN रेड लिस्टनुसार धोकाग्रस्त (Threatened) श्रेणीत मोडतात. अभ्यासात असेही आढळले की, संख्येच्या दृष्टीने शार्क आणि रे यांच्या एकूण पकडीपैकी सुमारे ६५ टक्के पकड औद्योगिक मत्स्य व्यवसायातून होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने लहान वयाचे, तसेच आकाराने लहान शार्क व रे अडकतात. विशेष म्हणजे, मच्छीमारांशी झालेल्या संवादातून असे स्पष्ट झाले की, शार्क आणि रे यांपासून मिळणारे उत्पन्न त्यांच्या एकूण कमाईपैकी साधारण एक ते पाच टक्के इतकेच असते. त्यामुळे जिवंत अवस्थेत जाळ्यात अडकलेल्या संकटग्रस्त किंवा लहान आकाराच्या शार्क आणि रे यांची सुरक्षित सुटका करण्यासारख्या उपाययोजना राबविल्यास, त्याचा आर्थिक फटका तुलनेने अत्यल्प राहू शकतो. - गरिमा बोरा, सागरी संशोधक, दक्षिण फाऊंडेशन
 
मिनिमम लीगल साईज’ म्हणजे काय?
 
‘मिनिमम लीगल साईज’ म्हणजे, एखाद्या मासळीची किंवा शार्कची कायदेशीररीत्या विक्री व किनार्‍यावर उतरविण्यासाठी निश्चित केलेली किमान लांबी. या लांबीपेक्षा लहान मासे किंवा शार्क पकडले गेल्यास त्यांना पुन्हा समुद्रात सोडणे अपेक्षित असते. यामागील उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. लहान वयातील किंवा लैंगिकदृष्ट्या प्रौढ न झालेल्या शार्कना जगण्याची आणि किमान एकदा तरी प्रजनन करण्याची संधी मिळावी. त्यामुळे पुढील पिढी निर्माण होऊन त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या टिकून राहू शकते. दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाने ही नियमावली ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१’अंतर्गत जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये ५४ व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या समुद्री प्रजातींसाठी Minimum Legal Size (MLS) निश्चित करण्यात आला आहे, ज्यामध्ये केवळ दोन स्पेडनोज शार्क (३७.सेमी) आणि ग्रे शार्पनोज शार्क (५३ सेमी) या दोन प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ३७ सेमीपेक्षा लहान स्पेडनोज शार्क आणि ५३ सेमी पेक्षा लहान ग्रे शार्पनोज शार्कची मासेमारी करण्यास बंदी आहे. जंगलातील वाघाचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समुद्रातील शार्कचेही आहे. महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला ‘मिनिमम लीगल साईज’ नियम हा केवळ कायदा नसून समुद्राच्या भविष्यासाठीचा दूरदृष्टीचा निर्णय आहे. शार्कची पिल्ले आज वाचली, तर उद्याचा समुद्र अधिक समृद्ध राहील. मासेमार, व्यापारी, ग्राहक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे या नियमाचे पालन केले, तर महाराष्ट्रातील समुद्री जैवविविधता आणि मत्स्यसंपत्ती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर