मुंबई : (Jishnu Dev Verma) "महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. ग्रामीण आणि जनजाती भागातील महिलांच्या जीवनात या चळवळीमुळे लक्षणीय बदल झाले असून गावागावांत नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचले पाहिजे," असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
'फॉर्च्युन इंडिया' मासिकातर्फे आयोजित 'फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन' पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन मुंबईतील वरळी येथील हॉटेल फोर सीझन्समध्ये राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.(Jishnu Dev Verma)
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान तसेच 'फॉर्च्युन इंडिया'चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार उपस्थित होते.
यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, एझेडबी अँड पार्टनर्स या कॉर्पोरेट लॉ फर्मच्या सह-संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला तसेच उद्योग, व्यवसाय, बँकिंग आणि विविध क्षेत्रांतील प्रभावी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(Jishnu Dev Verma)
या पुरस्कार उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रभावी महिलांचा गौरव करण्यात येत असून, समाज, उद्योग, अर्थव्यवस्था आणि नेतृत्व क्षेत्रात महिलांच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.(Jishnu Dev Verma)